Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Thursday, 25 March, 2010

हसवणूकसंग्रहित
फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)
पहिला (फोन करणारा पुणेरी) : हेलौ..
दुसरा : बोला.
पहिला : देशपांडे आहेत का ?
दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत!
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.
(फोन बंद)

************************************************************************

मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत
द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...
'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच
जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत.
अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..
द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत..
************************************************************************

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.
कसे ????
असे कसे विचारता ????
कसे ते पाहा.
एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते "अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते"
नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 20 मैत्रिणींना फोन करतो.
ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणी सांगतात.
दहा दिवसानंतर ..........
आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.
तेव्हा तो सांगतो "अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो"
बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 20 मित्रांना फोन करते.
त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्यांच्याच घरी होता.
आणि.. आणि..
उरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात

Thursday, 18 March, 2010

पंढरीच्या पांडुरंगा .....

कवी-शंकरराव साळुंखे
पंढरीच्या पांडुरंगा
तुझे डोळे बंद आहेत, तेवढं देवा बरं आहे
उघडशील डोळे तर, वीट सोडून पळून जाशील llधृll

बडवे तुझे चोर झाले, मग भक्तही महाचोर बनले
तुझ्याच साक्षीनं तुझ्या नगरीत, अभद्र व्यवहार सुरु झाले
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ll१ll

ठकाला राहायला मठ आहे, महाठकाला आश्रम आहे
ख-या भक्ताला फुटपाथ आहे, महारोग्यांच्या तोंडाने (घाटावर)तुझा गजर सुरु आहे
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ll२ll

मंत्र्याकडून तुझी पूजा, वारक-यांना रांगेची सजा
रांगेशिवाय दर्शन नाही, पैशाशिवाय स्पर्शही नाही
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ll३ll

स्नानासाठी चंद्रभागा, वाळवंटी चोरांचा दंगा
पुंडलिकाच्या पुढेच देवा, चालतो त्यांचा नाच नंगा
आळवून, आळवून तुझ्या अभंगा
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ll४ll

तुझ्या नावावर अनेकांनी, अमाप संपत्ती गोळा केली
मठ बांधले, आश्रम बांधले, सवते सवते फड झाले
वारक-यांनाही कोडे पडले
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ll५ll

कीर्तनाच्या फडावर, बुवाचं लक्ष बाईवर
हात ठेवून माळेवर, भजन विण्याच्या तालावर
सारा व्यवहार सुरु आहे
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ll६ll

आता तुझा सावता नाही, चोखा–सखा भक्त नाही
गोरा नाही, जना नाही, अभंग तुझे गायला आता
खरा तुका सापडणार नाही
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ll७ll

आता मात्र उघड डोळे, खरा संत शोधण्यासाठी
उद्धार त्याचा करण्यासाठी, तरच तुला देवपण आहे
नाहीतर नुसत्या दगडाला, पाणी घालायला इथं
कुणाला रे सवड आहे ?
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ll८ll

*******************


Tuesday, 16 March, 2010

हेड्या


लेखक-रंगराव पाटील

चिलमीचं धुराडं पेटवून ज्ञानू दलाल आपल्या अंगणातच तिन्ही सांजचा धूर काढीत बसला होता, तोच बाबू खुचीकर त्याच्या अंगणात आला. भुईतनं वर आलेल्या एका दगडाला त्याच्या अंगठ्यानं जोरात सलामी दिली आणि डावा डोळा बारीक करून तो विव्हळला.
“आगा ऽ ज्ञानदा ऽऽ”
“कायरं बाबू?” – ज्ञानू दलाल सपाट्यानं उठला.
“आयला! कसलं रं हे अंगाण तुझं !”
“माझ्या अंगणात तेरा क्या है रे ऽऽ? ज्ञानू दलालानं हळूच गंमत केली.
“मेरा काम हाय म्हणूनच आया है!” बाबूनं कळ सोसत धेडगुजरीत न म्हणता धेड मुसलमानीत म्हटलं. हळूच दलालानं अंगणात टाकलेल्या घोंगडयावर तो बसला. बसल्या-बसल्या अंगठयावरून हळूवारपणे बोटं फिरवीत होता. आणि तोंडाने फुंकर घालत होता. ज्ञानू दलालानं त्याचं ते धुराडं बाबुकडं दिलं आणि म्हटलं,
“वड वड, चिलीम वड. पाक कळ कमी येतीया !”
“आरं कशाची कळ कमी येतियारं ऽ तुला लेका गमज्या वाटतिया. मी कोंत्या परसंगानं तुझ्याकडं आलो आणि तू माझी चेष्टा लावलियास.”
“आरं परसंग कोंताबी असूदे. माझी ही चिलीम पाक बुकना ऊसळतिया त्या परसंगाचा. त्या संकटाचा धूरच काढतिया माझी बया.”
“आयला त्या परसंगाच्या हुली हो...! आणि त्या चिलमीच्या आता काय म्हणू...!”
“कारं, माझ्या का चीलमीला शिवी?”
“लेका कळ कसली आली? अंगाण म्हणायचं का टंगाण रं हे तुझं ?”
“काय झालं?”
“अंगाण जरा सप्पय करुनीस्का!”
“का?”
“आमच्या सारखी हितं सप्पय हुयाची एळ आली की!”
“गरीबचं हे असंच असतंय...!”
“लेका ठॅस कसली लागली. झीटच आली.”
“म्हणूनच म्हंतुया हं एक झुरका. झीट पाक कमी येतीया!”
“बरं, आण त्येच्याऽयला. आदीच माझं डोस्कं ठिकाणावर न्हाय. त्यात ह्यो अंगठा तसा फुटला न्हाय, मुका मार बसला. पण कळ जोरात आली. आण आण चिलीम तरी आण!”
बाबू खुचीकरानं चिलीम तोंडाला लावली.
“आयला! गुळभाताला बरं बुलीवलंस रं बाबू?” दलाल.
“तुला रं कवा कळलं?” - बाबू.
“मला उशीर कळलं. कोरेगावचं स्थळ. पाच हजार हुंडा. नव्हं, ठरीवलंस व्हयरं पूरीचं लगीन?” दलाल.
“व्हय!” बाबू.
“पोरगा काय करतो?”
“शेती!”
“शेती?”
“व्हय!”
“आणिक पाच हजार हुंडा?”
“आरं काय करतुस? कुठं जमूनच इना. टाकलं कसंतरी ठरवून!”
“बेस झालं” –दलाल.
“कशाचं बेस झालं? आता एक नवीनच घोर लागलाय जीवाला.”
“त्यो कसला?”
“पाच हजार पैदा करायचं कसं?”
“व्हय की!”
“मग?”
“काय तरी जमाव करून पूरीचं लगीन तर ठरवू म्हंटलं. नावानाव लांबतच चाललवतं तिच्या लग्नाच! पर आता डोस्क्याला भीरुड लागल्यागत झालयं.”
“का?”
पैशाची जमवा जमव कशी करायची?”
“तू काय तरी येवजना केली असचील की?”
“केलीया की.”
“मग?” – दलाल.
“पण मेळच बसंना.”
“काय काय येवजना केलीयास?”
“म्हस इकायची.”
“तिचं किच्च याचं?”
‘हजार दीड हजार.”
“आणिक?”
“मेव्हणा दील एक हजार बरं.”
 “दोन हजारात तुझ्या बानं लगीन केलवतं का?” – दलाल.
“ह्यो तिडा हाय बघं.”
“मग रं?”
“दलाल, तुच मार्ग काढ कायतरी ह्यातनं.”
“म्हशीचं हजारच कसं रं?”
“तसचं!”
“काय झालं? लाटा हाय?”
“न्हाय.”
“मग?”
“म्हशीच्या शिंगास्नी भीरुड लागलाय.”
“मजी?” दलाल बोलला.
“शिंगाला किड लागलीया रं तिच्या!”
“आणिक?”
“म्हशीला शिंगच न्हायती.”
“न्हायती?”
“अहं, शिंग किडून त्येचा भुसा पडतोय. आता म्हस भुंडी दिसतीया. नुस्ता खुटुंबरा
-हायालय बघ शिंगाचा.”
“आत्तारं, मग कों रं घेणार हे असलं धुड?” –दलाल.
“आर, दुधाला लई नंब्री हाय म्हस.”
“हे बघ बाबू, जनावराची किंमत शिंगावारच अवलंबून असती.”
“मग रं?”
“त्येच अवघड झालंय.”
“तुझ्या म्हशीला जर शिंगं व्यवस्थित असती तर तीन – साडे तीन हजाराला मरान नव्हतं.”
“मग आता कसं करायचं?”
दोघेही दूर कुठे तरी पहात राहिले. रात्र पडू लागली होती. माणसं त्यात गुडूप होत होती. तोच दलाल बोलला.
“बाबू”
“का?”
“उठ.”
“आणिक?”
“घरला जा.”
“मंजी?”
“उठ मजी झालं.” बाबू उठला. दलालाकडं खुळ्यागत बघत राहिला.
“तुझी म्हस म्या इकली.”
“इकली?”
“व्हय.”
“केवढयाला?”
“तीन ते साडे तीन हजार येतील. फुडच्या गुरुवारी वडगांव गाठू.”
“बाजार वडगांव?”
“हं.”
“दलाल लई उपकार हुतील तुमचं.”
“मुकाट्यानं घरला जातूस, का आता?”
“जातो... पर...”
“पर काय!”
“त्यो भीरुड...”
“छल पळ. ती सगळी यवस्था मी करतो.. उगंच आता पाणेव फुटल्यागत करू नकं. आरं इस वर्सं ह्यो फाकडया हेड्याचा धंदा करतुया. कंच जनावर कसं गि-हाइकाच्या गळ्यात मारायचं, हेची चांगली कला माझ्याजवळ हाय.”
“बरं चलू का? इतर तयारीला मीबी लागतो.”
“हं खुशाल.”
बाबू खूचीकर निघाला. पंजाचा काठ हातात धरून ऐटीत पावलं टाकीत अंधारात नाहीसा झाला.

*******
ज्ञानू दलाल डोंबार्‍याच्या पळापुढं आला आणि त्यानं हाक दिली,
“आरं कोण हाय कारं गडी?” तसा भिवा डोंबारी बाहेर आला त्यानं थोडसं लवून म्हटलं – “राम राम पाटील!”
“आरं मी हेड्या हाय हेड्या. ज्ञानू दलाल म्हणत्यात मला! पाटील, कुठनं आणलास आणिक?”
“तुमी सगळेजण आमाला पाटीलच हायसा. मग कोनबी असुद्या.” भिवा असं नम्रतेनं बोलला आणि मग त्यानं आपल्या पालाकडं बघून हाक दिली.
“ए सायकले ऽऽऽ !”
“का वं?” एक पोरगी पालातून बाहेर डोकावली.
“बसायला आण पाटलास्नी.” पोरगी थोड्याच वेळात एक चटई घेवून आली. पालापुढं अंथरली. आणि पोरगी पुन्हा आत गेली.
“बसा.”
“बसाय न्हाय आलो.”
“तुझ्याकडं याक काम हाय.”
“असु द्या की. बसा तरी आदी खाली.”ज्ञानू दलाल त्या चटईवर बसला. आणि भिवा चटईच्या कोप-यावर टेकला.
“बरं, च्या पेणार काय?”
“तर!”
“न्हवं, आमचा घेता का न्हाय म्हणून म्हटलं.”
“योकच कप सांग. अर्धा अर्धा पिवू दोघं.”
“का? अर्धा का?”
“व्हय.दोघात योक.”
“सायकले ऽऽऽ” भिवानं पुन्हा ऑर्डर सोडली.
“हं, हं!”
“च्या योक कप.”
“बरं,” आतून दुसराच एका बाईचा आवाज.
“काम एक म्हत्वाचं हाय.”ज्ञानू दलाल.
“सांगा की!”
“म्हशीची शिंगं एक दोन पायजेंत.” तसा भिवा हसला.
“कशाला वं मालक?”
“सांगतुय ते ऐक मजी झालं.”
“बरं सांगा.”
“चांगली कोच्यारी पायजेत.”
“बरं.”
“हायतं का?”
“घरात कुठली वं? शिंगं हुती त्येचं भवरं, फण्या केल्या. आता शिंग हुडकली पायजेत.”
“किती दिस लागतील?”
“साताठ दिवसानं...”
“अहं दोन दिवसांत पायजेत.”
“बघतो.”
“बघतो न्हवं! शिंग मातुर नंब्री पायजेत.”
“त्येची तुमी नका करू काळजी.”
तेवढयात चहा आला. भिवानं त्याच्यापुढं कप केला.
“न्हाय. न्हाय. अर्धा अर्धा. ठरलंय तसं.”–ज्ञानू.
ज्ञानू दलालानं कपाचा दांडा धरला. बशीत चहा ओतला. दोघांनी चहा घेतला. भिवानं कपबशी बाजूला ठेवली.
“पण शिंग कशाला?” भिवाचं कुतूहल.
“कुणाला बोलायचं न्हाय. सांगायचं न्हाय. मी सांगतुय तेवडं काम करायचं आणि पैसं बोलायचं.”
“हॅ हॅ पैसं कशाला? आमी तुमच्या माळावर उतरायचं आणि तुमचीच भाकरी खायची. तुमची जरा तरी चाकरी करू द्या की” ज्ञानूनं दंड्क्याच्या खिश्यात हात घातला.
दहा दहा च्या पाच नोटा त्याच्यापुढं टाकल्या.
“आगं आय गं ! इतक्या नोटा?”-भिवा दचकला
“मग किती?”
“फक्त एक नोट चालल आपल्याला.”
“खरं?”
“व्हय”
“बरं”, दलालानं पुन्हा नोटा हातात घेतल्या आणि त्यातल्या दोन नोटा त्याच्या हातात कोंबल्या.
“एक रग्गड की!”
“गप गुमान घ्याचं.” दलालानं तंबीच दिली आणि पुढं सांगितलं,
“काम फैना करायचं कोच्यारी शिंग”
“हं!”
मग दलालानं चिलीम काढली. आपण ओढली. भिवाकडं केली.
“अं हं!”
“लेका वड.गांज्या वड्तुस आणि चीलमिला कायं हुतयं रं?” थोडया वेळानं दलाल उठला.
“छलू  रं?”
“हं!”
आभाळात कवाच चांदण्या पेटल्या होत्या.माळावरून भरकटत येणारया वाऱ्याच्या दिशेनं ज्ञानू दलाल सपाट्यानं गावाकडं सुटला.
दोन तीन दिवसानं दलाल पुन्हा डोंबार्‍याकडं आला.अंधारातच पालाफुडं उभा राहिला.इकडं तिकडं पहात त्यानं हाक दिली,
“आरं भिवा ऽऽ”
“कोण हाय?” आतून आवाज आला आणि पाठोपाठ भिवाही बाहेर आला.
“दलाल हायत काय?”
“व्हय!”
“आलो हं!” असं म्हणून भिवा पुन्हा आत गेला आणि थोडयाच वेळात हातात दोन शिंगं घेऊन आला. ती आपल्या हातात घेऊन दलालनं नीट निरखून पाहीली.
“वारं फाकड्या. झॅक, छल..”
“झॅक, छल पर कुठं?”
“गप छल लांबड लावू नकं...”
“छला तर...”
पंधरा वीस मिनिटातच दोघेही बाबू खुचीकाराच्या घरापुढं आले.
“बाबू ऽऽ”
“अ ऽ ऽ य ...”
“ये भाईर ये जरा.”
“कोण दलाल हायत काय?”
“व्हय.”
“या की आत.” बाबू बाहेर येतच बोलला.
“लेका तू भाईर याय लागलायस आणि आमी आत येऊ व्हय रं?”
“हयो बघा, आत जातो! या.”
“गप भाईर ये आता.”
“हयो भिवा!”- दलालनं ओळख करून दिली.
“बरं.”
“ही शिंगं.”
“शिंगं?”- बाबू दचकला.
“व्हय, आता प्रश्न इचारू नकं. म्हस कुठं बांधलीयास?”
“परड्यात.”
“छल तर तिकडं.”
“थांबा खंदिल घिऊन आलो.” बाबू आत गेला सोप्यातला कंदील त्यानं उचलला आणि साटशिरी बाहेर आला. त्याच्या घरातील माणसं अचंब्यानं हे सगळं पहात होती.
परड्यातच बाबूचा गोठा होता.तिथे तिघेही आले. गोठयात घुसले.
“भिवाऽऽ”
“अं ऽऽ”
“ही म्हस.”
“बरं”
“तिच्या शिंगाला भीरुड लागून ती मुंडी झालिया.”
“बरं.”
“बरं नव्हं.”
“हं”
“ही शिंगं तिच्या टक्कुरीवर फैना बसवायची.”
“अगं आय गं”भिवा सटकून खालीच बसला.
“हं, तसलं काय चालयच न्हाय.”
भिवानं मग बाबूच्या हातातला कंदील घेतला तो वर करून म्हशीची शिंगं पाहीली. म्हशीच्या डोक्यावर तीन-तीन बोटा एवडं उंच बुडकं राहिलं होतं.त्यात ही शिंगं बसवायची कशी याचा भिवानं क्षणभर विचार केला आणि गर्कन वळला.
“हयो कंदील धरा.” त्यानं बाबुजवळ कंदील दिला आणि भिवा सपाट्यानं बाहेर पडला तोच दलालानं त्याला धरलं.
“का रं?”
“शिंगं घोळायची हत्यारं आणून शिंगं बशिवतो की!”
“बरं बरं आमाला वाटलं पळूनच निघालास.”
“छ्या छ्या, हयो पळतच आलो बघा.”
“लवकर ये.”
भिवा पालाकडं गेला आणि हे दोघे मग गोठ्याच्या बाहेर बसले. ज्ञानू दलालानं आपलं धुराडं काढलं.दोन चार झुरकं होतात तोच भिवा हत्यारं घेऊन आला.दोघेही उठले.
“आता तुमी बसा, कंदील तेवडा ध्या. कसं फैना काम करतो बघा.” असं म्हणून भिवा गोठ्यात घुसला आणि दलालानं एक जोराचा झुरका मारून चिलीम बाबुकडं केली.

*******
“झॅक जमलं बरं का, दलाल!” असंम्हणून बाजारातून आलेला बाबु खुचीकर आपल्या सोप्यात टेकला दलालही त्याच्या जवळ बसत म्हणाला.
“भिवा डोंबारी खरा कसबी बरं का! शिंगं बशिवल्यावर म्हस काय फैना दिसाय लागली रं..?”
“तुमी इगत काढली म्हणून बरं झालं!”
“देवानं सुचविलं नं म्या सागितलं.” तेवढयात बाबुची लग्नाची पोरटी बाहेर आली.
“बाळे ऽऽच्या आण दोन कप. पिऊं दे निञासवानी आणि दलालाकडं वळून तो म्हणाला –
“बरं दलाल, तुमचं बिल काय?”
“आता गप बसतुस का ? म्या त्या दिवशी काय सांगितलं?”
“तसं कसं एवार म्हणून काय तरी पाळलाच पाहीजे.”
“तुला लईच अवघड वाटत असलं तर, पुरीच्या लग्नात आहेर पुकार माझ्या नावावर शंभर रुपय.”
तेवढयात चहा आला. बाबूची पोरगीच घिऊन आली. तिच्या मागनं बाबूची बायको पदर नीट घेत चौकटीत येऊन उभी राहिली.
“इकली व्हय!?”
“व्हय!”
कितक्याला?”
“बरोबर तीन आलं की.”
“तीन काय?”
“तीन रुपय.”
“सवनं इच्यारतीया मी !”
“अगं तीन हजार गं !”
“बेस झालं जमलं आपलं.”
“आगं, दलाल हुतं म्हणून हे जमलं न्हायतर एक हजारच् कसं तरी आलं असतं..”
थोडयाच वेळात दलाल उठला.
“जातो रं.”
“लग्नाला यायचं बरं का!”
“व्हय व्हय.”
“लगीन चिठ्ठी आणिक देतोच.”
“चाललं की!”
दलाल घराकडं सुटला. सांज झाली होती.आणि घराघरातून सायंकाळचा कालवा ऐकू येत होतं.

*******
सकाळ झाली. कोवळं ऊन त्या वाडीवर विखुरलं होतं. बाबू खूचीकर हातात लग्नपत्रीकांचा
गठ्ठा घेऊन बाहेर पडतोय न पडतोय तोच त्याला त्याच्या घराच्या दिशेनं चार पाच माणसं येत असलेली दिसली आणि त्याच्या मागं बाबू खूचीकराची भीरुड लागलेली म्हसही होती. एका पाव्हण्यानं म्हशीचं दावं धरलं होतं आणि दुस-याच्या हातात ती भिवा डोंब-यानं दिलेली शिंगं होती. ह्या लग्नपत्रिका हितच इस्कटून इथून पळून जाववं असं त्याला वाटलं. पण, त्याचा पाय जमिनीवरून हालत नव्हता. खिळा मारल्यागत तो त्या ठिकाणी खुळाकावरा होऊन एकटक पाहतच राहीला.
तो पर्यंत ती पाहुणे मंडळी त्याच्या दारात येऊन दाखल झाली.
“काय पावणं ! बेस हिस्का दाखिवलासा तुमच्या गावचा!”
“काय झालं?” – बाबू.
“ही तुमची म्हस आणि ही तुमच्या म्हशीची शिंगं.”
“असं करतेत व्हय पाव्हणं?” – दुसरा पाहुणा.
“काय केलं?” – बाबू.
“काय केलं ते तुमचं तुमाला म्हाईत!”
‘हं, काढा ते पैसं” – एकजण म्हणाला.
 “कशाचं?”
“म्हशीचं, हे भांडवल घ्या ताब्यात आणि पीस पैसं टाका.”..
तोच बाबू झटकन बोलला.
“जरा कळ काढा पाव्हणं उगच असं घोडयावर बसल्यागत करू नका.”
अंगणात एका दगडाला म्हशीचं दावं गुतपळून एक पाव्हणा म्हणाला –
“अहो, साताठ मैल चालत आलूया परत फिरायचं हाय. चालनं निबंना म्हणून तर एकाला म्हशीवर बशीवला आणि तुमी म्हणताय घोडयावर बसल्यागत करू नका. असं म्हशीवर बसायला लावून फशीवलं तुमी.”
“जरा थांबा च्या तरी प्या.”
“पैलं पैसं टाका.”
“बाळ्या, दलालास्नी बोलावून आण जा रं..” बाबूचं पोरगं ठया पळालं. थोडयाचं वेळात दलालही कतई फेटा डुईला गुंडून पळतच आला. त्यानं सगळा मामला ओळखला.
चहा पाणी झालं. दलालानं म्हटलं –
“हं बोला.”
“तुमच्या पस्नं ही म्हस घिऊन गेलो. सकाळच्या पारानं नदीला म्हस हौसनं धुयाला न्हेली. म्हस चांगली धुतली.. आणि मग आत नदीच्या ढॉत ढकलली.”
“पवायला?”
“हं! म्हसं ढॉत शिरली आणि थोडया एळानं म्हशीची शिंगं लागली पवायला पाण्यावर. कशानं चिटकविली हुती कुणान ठावक.. तिच्या शिंगाला भीरुड लागल्याला हाय..”
“ढॉत म्हसरं किती हुती तवा..?” दलाल.
“दहा बारा तरी असतील की! पाणवठयावर काय हॉ चिक्कार मसरू असतं..”- पाहुणा.
“असतं का न्हाय?” – दलाल.
“व्हयं.”
“मग ही आमची म्हस नव्हं..”
“अहो ऽ ऽ” – पाव्हणा.
“सांगतो ऐका. ही आमची म्हस नव्हं. दुसरी कुणाची तरी तुमी घिऊन आलाय. आमची म्हस फैना शिंगाची आणि ऐटबाज हुती. ही शिंगाला भीरुड लागलेली म्हस तुम्ही कुणाची घिऊन आलाय? आमाला फशीवता व्हय? पुलीस – कंप्लेंट दिऊ का?”
“अहो पावणं ऐकून तरी..”
“तुमची म्हस कुणीतरी न्हेलीया आणिक तुमचं शानं पोरगं ही भीरुड लागलेली म्हस घरला घिऊन आलंया...”
“तसं न्हाय...”
“आता फुडं बुलू नका. आलासा तेच चुककेलीसा.आता धड अंगानं नीट तुमी तुमच्या गावाकडं जावा. आमाला फशीवता?” दलाल आवाज चढवून बोलला.
सगळं पाव्हणं चाक्कारलं. तसा बाबुलाही जोर चढला.
“आमची म्हस तिकडं इकून ही दुसरी म्हस आमच्या गळ्यात मारता व्हय? आता बिन वंगनाची गाडी हाणता का? उठा सगळी.”
गावातली माणसं जमली.एक पोपोरगं पाहुण्याच्या अंगावरच धावून गेलं.दलालानं पोराला आडीवलं.
पाव्हणं उठलं.म्हैस सोडली आणि वाटेला लागले. त्यातला एक पाव्हणा आपल्या माणसांना म्हणाला,
“आयला ढॉतनं कुणाची म्हस हाणून आणली पोरानं कुणास ठावक?”
माणसं पांगली. बाबू आणि दलाल हळूच घरात घुसले. बाबूनं दलालाचे हात हातात घेतले,
“दलाल बिल किती?”
“बाबू ऽ ऽ“काय?”
“माझ्या नावावर दोनशाचा आहेर पुकार तुझ्या पुरीच्या लग्नात.” असं म्हणून दलाल बाहेर पडला. बाबू मात्र दलालाकडं कितीतरी वेळ पहात तसाच उभा राहीला.

***********************************************