Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Friday 30 July, 2010

''ती''

तिला पाऊस खूप आवडतो आणि
मला पावसात 'ती',
तिला बोलायला खूप आवडते आणि
मला बोलताना 'ती',
मला ती खूप आवडते पण.......
तिला नाही आवडत मी !!!!!
म्हणून खड्यात गेला पाऊस आणि
खड्यात गेली 'ती'.....
-संग्रहित

Saturday 10 July, 2010

किशाकाका

लेखक-श्री रवींद्र जोशी
‘आरं काय सांगायचं तुमाला लेकरांनू! यल्लामाच्या यात्रंच्या वेळची गोष्ट. तवा मी असंन पंधरा-सोळा वर्षाचा, पण शरीर काय! जसं लवलवतं पातं! देवीच्या देवळाबाहेर निसती ढोलावर टिपरी पडली न् काय... सरासरा अंगावर काटा आला... अशी सर्वांगातून वीज गेल्यागत झालं का नाई... अन् पायांनं धरला ताल! धरता धरता कधी उटलो आनि नाचायला लागलो त्येच ध्यानात आलं न्हाय. आपसूक मानसांनी भोवती कडं टाकलं आनि मधी मी. नाचाचा जोश जसा वाढत गेला तशी मानसांचं रिंगण आनि मोठं व्हायला लागलं. लय वाढत चालली तशी ढोलाला काय निभतंय! संगती दोन-तीन ताशेवालं आलं आनि त्यांच्या काड्यांनी मात्र बराबर लय साधली; पण आपन काय कमीचं होतो काय? ... अरं काठ्या मोडुस्तवर भिंगरीवानी नाचत राहिलो. मदी मदी ‘यल्लमाच्या नावानं चांगभलं ऽऽऽ!’ असा गर्दीचा नारा फकस्त कानावर येत होता. पाच पन्नास हजार तरी मानसं भोवती बगत असत्याल. घंटाभर कुनाला स्वास घिऊ दिला नाही.’
किशाकाकाची सांगायची पद्धत पार कान टवकारून ऐकण्याजोगी होती, पण सांगता सांगता फार अतिशयोक्ती करायची सवय – त्यामुळं मूळ कथा बाजूला राहून त्या अतिशयोक्तीतल्या आक्रितातच आमची मनं डुंबायची. आता हेच पाहा ना, ‘घंटाभर मानसं स्वास रोखून पहात होती’ म्हटल्यावर मी आणि जाधवाचा विल्या ‘कशी काय माणसं इतका येळ स्वास न् घेता जिती राहिली असतील’ हाच विचार करत होतो. आणि किशाकाकाचा किस्सा केव्हाच पुढे गेला होता. काही का असेना, किशाकाका अशा फार गंमतीजमती सांगायचा. त्याच्या हकीकती आणि त्यानं स्वतःच्या हातानं बनवलेला मटन रस्सा ही दोन आकर्षणं दर आठ-पंधरा दिवसाला त्याच्याकडं खेचून न्यायची.
गावात किशाकाकाचं एकट्याचंच दोन खोल्यांचं बि-हाड. तशी त्याची भावकी फार तालेवार; पण त्यातलं कुणी त्याच्याशी संबंध ठेवून नव्हतं. मला आठवतंय तसा किशाकाका एकटाच होता. मी दहा-बारा वर्षांचा असेन, जाधवांचा विल्या माझ्या वर्गातला. त्याची नि माझी तशी एकदम गट्टी... एकदा मला म्हणाला, “का रं चंद्या, मटन खाऊन बघायचं का येकदा?”
एकदम कावराबावरा होत मी म्हंटलं, “विल्या, तिच्यायला आमच्यात तसलं काही चालत न्हाई... म्हाईत न्हाई व्हय रं तुला?”
“आरं गुळबाट्या म्हनून तर इचारतोय!”
“ह्यॅ कायतरीच काय... लेका आयला कळलं तं जोड्यानं हानंल की मला.”
“तिला कशाला सांगायचं... रातच्याला माझ्या घरी अब्यासाला तुजा डबा घिऊन चल. तितनं फूडं काय करायचं त्ये मी करतो.”
“आरं, पर तुझ्या घरच्यांनी, न्हाईतर आणि कुणी आयच्या कानावर घातलं मंजी?”
“त्येची फिकीर तू करू नगस. बिनधास राहा. काय करायचं ते मी करतो बरोबर.”
तसा विल्या फार ब्येना. माझा त्याच्यावर पूर्ण भरवसा होता आणि म्हणून मी डोळे मिचकावत, ‘मग हुं दे तिच्यायला!’ असा होकार दिला.
रातच्याला विल्याच मला बोलवायला आला. गावात लाईटी नव्हत्याच; पण अख्या गावातले रस्ते पायाखालचे असल्यामुळे न ठेचकाळता विल्यानं मला किशाकाकाच्या घरी आणलं. बंद दाराबाहेरून विल्याने हाक मारली, “किशाकाका...किशाकाका!” दार उघडून किशाकाकानं आमाला आत घेतलं. आत गेल्या गेल्या मस्त शिजणा-या रश्श्याचा वास नाकात भरला. आईशप्पथ त्याच्या आधी चव पण घेतली नव्हती, पण त्या वासानं एकदम तोंडाला पाणी सुटलं.
“किशाकाका, आज मैतर आणलाय संगतीला. माझ्या वर्गातला... चंद्या!” विल्यानं सांगितलं.
“आरं, मग यिवू द्या की! कोण बामनाचा चंद्या न्हवं... आरं येकी आत!” मला जरा चपापल्यासारखं झालं. किशाकाकानं बाहेरचं दार लावून अडणा घातला. म्हणाला, “बैस बैस रं चंद्या! आरं, काय अवगडू नगंस! हितं आलेलं कुनाला बी कळणार न्हाई.” माजं काळीज जरा स्वस्थ झालं.
“हे बग चंद्या, काळजीचं काय कारण न्हाय. आरं, तुजा बा बी येत होता हितं, वहिनीस्नी चोरून! आरं, ह्ये कालवणच तसं असतंय; पण जगाची रीत पाळायला लागतीय बाबा! जरा गुपचूप करायचं! तुज्या बाचं आणि माजं भावाभैनीचं नातं..”
मी उडालोच. नीटधरनं किशाकाकाकडे पाहिलं. दिवसा गावात दिसायचा तसाच चकचकीत. चापून चोपून नेसलेलं दुटांगी धोतर, पांढरंफेक – नवं वाटावं असं. वरती परीटघडीचा मलमलचा बिनकॉलरचा अंगरखा त्यातून तितकाच स्वच्छ दिसणारा बनियन. काळा कुळकुळीत पण दाढी घो ऽ घोटून अगदी गुळगुळीत ठेवलेला चेहरा. दोन भुवयांच्या मध्ये बारीकशी गंधाची टिकली. मध्ये भांग पाडून दोन्हीकडून नीट वळवलेले कुरळे केस... जरा जास्तीच्या तेलानं कंदिलाच्या उजेडातही चमकणारे. नाकी डोळी नीटस. वास्तविक हे त्याचं रुपडं माझ्याही सरावाचं होतं, पण ‘भावाबहिणी’च्या नात्याच्या उल्लेखानं आता त्याचे हावभाव आणि बोलणं बायकी असल्याचं मला जाणवलं.
“विलासराव, जरा घोंगड्याची पट्टी हाथरा पावण्यास्नी टेकायला.”
विल्यानं अलगत झटकून घोंगड्याची पट्टी अंथरली. आम्ही दोघं त्यावर बसलो.
“विलासरावाचा दोनपारी सांगावा आला. मंग सांजच्यालाच भाकरी करून ठिवल्या. आता थोडी कळ काढा... हुईलच येवढ्यात कालवण.” असं म्हणत, आणखी काय काय मसाला टाकत, कालवण ढवळत तो चुलीपुढं उकिडवा बसला.
“किशाकाका, मी काय मदत करू का?” विल्यानं विचारलं.
“तुला काय येतंय शिंग-या... बरं असं कर, त्या शिंकाळ्यातन चार कांदे काढ.” विल्यानं कांदे काढले आणि मुठीने फोडणार इतक्यात,” शिंग-या, लेका थांब...ती सुरी घे तितली. शिस्तशीर काप... काय गाव जेवनाला आलायास का काय?” किशाकाकानं दटावलं.
मी त्या राहत्या घरावर नजर फिरवली. साधीसुधीच गावठी राहणी, पण एकूणच सगळं स्वच्छ. भांडीकुंडी चकचकीत. हारीनं उतरंड मांडलेली. चुलीपुढं सुद्धा अजिबात पसारा नाही. एकच लाकडी कपाट. कपड्यांचं असावं. दोन्ही दारं व्यवस्थित बंद. एका दारावरचा आरसा लख्ख पुसलेला, एकीकडे किशाकाका हकीकत सांगायला गुंतलेला. “आरं चंदूशेट....” प्रत्येक वेळी नाव घेताना वेगवेगळ्या पद्धतीनं पुकारायची काकाची त-हा..
“तर काय सांगत होतो... एकेकाळी बामनबी यज्ञात हे असले कालवण खायचे. आरं त्याच्यात कसलं आलंय पाप अन् पुन्य?”
किशाकाका अभक्ष्य भक्षणाबद्दलचं माझं मानसिक ध्यैर्य वाढवत होता. काय असेल ते असो, पण त्यादिवशी आपण त्या सामिष भोजनाला जे चाटावलो ते आजअखेर!
नंतरही महिन्या दोन महिन्यांतून एखाद्या दिवशी लहर यायची आणि मग विल्याबरोबर आधी निरोप पाठवुन रात्री गुपचूप किशाकाकाकडं जावून यायचो.
दिवसा किशाकाका गावभर कुठं कुठं फिरत राहायचा. आमच्या आईशीही बोलायचा, “काय वैनी, कसं काय चाललंय?”
“ये रे किशा. बैस. थोडा चहा पिऊन जा.” आई म्हणायची आणि मग गावात कुणाकडं पाहुणे आले, कोण कुठल्या गावाला गेलं, कुणाचं लग्न ठरलं, कुणाचं मोडलं, का मोडलं... वगैरे गाव उचापतीच्या गप्पा चालायच्या. त्याच्या त्या हातवारे करून खुलवून सविस्तर सांगण्यानं आई खुश असायची. मी मात्र घरी किशाकाकाला ओळख दयायचो नाही. त्याचं ते विलक्षण माना वेलावणं, बोलणं मला अशावेळी भलतंच चमत्कारिक वाटायचं. तोही, “काय बॅलीस्टर, निगाला का शाळंत?” असं तेवढ्यापुरतंच माझ्याशी बोलत असे.
एकदा तो गेल्यावर मी कुतूहलानं आईला विचारलं, “आई, किशाकाकाचं असं का गं वागणं बोलणं? एवढा मोठा झाला तरी एकटाच राहतोय! लग्नबिग्न कसं झालं नाही गं झालं त्याचं?”
“असतं बाबा एकेकाच्या नशिबात...” आणि पटकन सावरून म्हणाली, “ तुला नाहीत्या चौकशा कशाला हव्यात?... आपली आपली शाळा अन् अभ्यास बघ जा.”
किशाकाकाकडं महिन्या – दोन महिन्यातून राबता चालूच होतं. आता हळूहळू किशाकाका त्याच्या रसाळ गावगप्पांत आम्हाला गावातल्या भानगडीही सांगू लागला. आमचंही वय अशा विषयांच्या कुतुहलाचं झालं होतंच.
“आरं, काय सांगावं बेन्यांनू तुमाला... आपलं सरपंच...” आणि मग आवाजातला स्वर काढून घेऊन कुजबुजायला लागला, “कुटं अजिबात बोंबलणार नसलात तं सांगतो.”
“असं काय किशाकाका, तुमची शपथ!” आम्ही दोघंही एकाच वेळी बोललो. पुढची भानगड ऐकायची आमची अनिवार इच्छा होतीच.
“तर आपलं सरपंच... लई बाराचं! लेकी उजवल्या, सुना आल्या तरी ह्याची काय मस्ती उतरत न्हाय अजून!”
“काय सांगताय?” विल्या आश्चर्यानं म्हणाला.
“काय ऐकताय!” किशाकाका म्हणाला.
विल्याला असे मधे मधे आश्चर्याचे उद॒गार काढत सांगणा-याचाही उत्साह वाढवण्याची हातोटी चांगलीच साधलेली.
तर परवा काय झाली गंमत... आपल्या गावात ती नवीन नर्सबाई आलीया ना?... गावात नवीन, पण तशी जूनच. तर तिच्याशी जमिवलं की झांगट या गड्यानं!”
“ह्यॅ कायतरीच बोलणं तुमचं!” किशाकाकानं पुढची हकीकत मध्येच थांबवू नये म्हणून विल्यानं दिलेलं प्रोत्साहन.
“तर काय लबाड बोलतोय की काय... परवाचीच गोष्ट. रातीची सामसूम झाल्यावर गुपचूप आलं की तिच्या घरला. मग काय राजेहो... खेळ ऐन रंगात याला आणि दारावर थाप पडायला एकच गाठ!”
कारण नसताना माझी छाती उगीचच धडधडू लागली.
“आता आपल्या बोळकांडीच्या सामनेच तिचा दरवाजा. इतक्या राती कोन दार ठोठावतंय म्हणून मीबी दार उघडून समोर गेलो. बघतोय तं तिच्या दारात सरपंचाची बायको आणि ग्रामपंचायतीचं म्हादू गडी, हातात कंदील धरून.”
“आयला बरोबर पकडलं वाटतं बहाद्दरनीनं!” विल्या म्हणाला.
“न्हाय मर्दानू... ती आली तिच्या सुनंच्या पोटात लई दुखाया लागलंय म्हणून नर्सबाईला बोलवाया.”
“आणि मग?”...विल्याचा प्रश्न.
“मग काय... आत गडबडीनं कशीबशी आवराआवर करून नर्सबाईनं फुडलं दार उगडलं आणि सरपंच मागल्या दारानं पळालं.”
“वाचलं बिचारं.”
“वाचतंय कशानं? नर्सबाईला निगावंच लागलं सरपंचीन बरुबर. घरी जाऊन नर्सबाई बघत्यात तं काय? लगीच धावपळ चालू झाली. म्हादानं डाक्टर-कंपौंडरला बोलावून आणलं. डाक्टर म्हनाला आता हलिवणंबी शक्य नाही. चार बत्या लावा आणि नर्सबाईला दोन विंजक्शनं द्यायला सांगितली. धीर राहीना तसं झोपचं सोंग घिऊन पडलेल्या सरपंचाला बी माडीवरनं खाली बोलावलं आणि झाली काय गंमत... बत्त्या ढॅढॅवकनी पेटल्या तसं समद्यांच्या लक्षात आलं, सरपंच जाड निळ्या काठाचं पातळच धोतर म्हणून नेसलेला आणि नर्सबाई करवतकाठी धोतर साडी म्हणून नेसलेली! त्याच्यायला सुनबाई बिनघोर सुटली, पन सरपंच आणि नर्सबाई मातर जम अडकली!”
किशाकाकाला ‘हे तुमाला कुनी सांगितलं?’, ‘हे तुमाला कसं समजलं?’ असा प्रश्न कधी विचारायचा नसतो. किशाकाकाचा वावर सगळ्या पुरुषांत आणि बाईमाणसांत! त्यामुळं त्याची हकीकत पक्की असणार हे उमजून घ्यायचं असतं.
आता कॉलेजसाठी सात-याला राहायला आलो. मॅट्रिकनं विल्याची फारच अडचण करून टाकली, तसा शिक्षणाचा नाद सोडून तो गावातच शेती आणि रिकामटेकडे उद्योग करू लागला. मलाही आता दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीखेरीज गावी जाणं जमेना; पन प्रत्येक सुट्टीत गावी गेलो की एकदा तरी विल्याबरोबर किशाकाकाकडं रातची मेजवानी व्हायचीच. आता आमची वयं तशी चाबरट झाली होती. किशाकाकानं पस्तीशी ओलांडली होती; पण अजून नटण्या-मुरडण्यात फरक नव्हता.
“काय सांगायचं प्रोफेश्वर तुमाला! या विलासरावाला म्हाईती हैच की ....”
खरं म्हणजे काही माहीत नसलं तरी विलासराव त्याला, ‘तर काय...’ म्हणून पुस्ती द्यायचा.
“मागच्या आठवड्यात... जत्रेस्नं परत येत होतो. कोल्हापूरपतूरच्या येस.टी.त मागच्या शीटवर एक मेजर आणि त्याची बायकू असल्याली. मेजर कसा?... तर तरणाबांड, उंचापुरा, धारदार मिशा, पाणीदार डोळं, एकदम देखना. रुबाबदार. त्याची बायकोबी तशीच गोरीपान, चाफेकळीवानी, एकदम चिकनी. पण झालं काय कोल्हापूर स्टँडला मी पिशवी घिऊन उतरलो आणि इचार केला की अंबाबाईचं दर्सन घिऊनच गावची गाडी गाठावी. स्टँडपास्नं थोडं अंतर आलो आणि मागं वळून बगतोय तं मेजर माज्या मागं बायकू स्टँडवर सामान स्टँडवरच. हा गडी माज्या मागं... मागं...निगालाकी. मनात म्हनलं, ‘काय मानुस अस्तंय एकेक. येवढी दिकनी बाई सोडून आपल्या मागं?’ मी फुडं त्यो मागं, मी फुडं त्यो मागं... करता करता देवळाजवळ आलो, तरी हा मागं हाईच. आता म्हनलं आपनच धारिष्ट्य करायला हवं. मागं वळून हटकारला. म्हनलं, “गड्या इतकी देखनी नार सोडून माज्या मागं का रं बाबा?” तसा म्हणे, “त्या पांढ-या पालीला काय चाटायचंय?” खरं रुपडं हितं तुमच्या जवळ हाय. मी आता येनार तुमच्या संगतीच.” आरं बाबांनो, त्याची समजूत घालून वाटंला लावता लावता नाकी नव आलं माज्या.”
“बाकी खरंच हाय किशाकाका, देखनेपनात मला न्हाई वाटत अख्ख्या तालुक्यात येक बाई बरुबरी करील तुमची!” विलासराव म्हणाला.
प्रत्येक वेळी जेवणाबरोबर असा काहीतरी खमंग किस्सा असायचाच. पूर्वी कालवणाच्या जेवणाचा मी निरोप पाठवत असे. आता मात्र मी गावात आलेलं कळताच एकदा तरी जेवायला येऊन जायचा त्याचा निरोप असे. आता आम्ही वयानं वाढल्यानं, पूर्वीइतकं लपूनछपून, चोरून मारून जावं लागत नसे, पण फारसा गवगवा होण्यासारखं ते ठिकाणही नव्हतं. शिवाय रात्री दोन घंटे उशिरा का असेना पण घरात झोपायला येतोय, इकडं आईचं बारीक लक्ष असे.
कशीबशी पदवी पूर्ण करण्यापर्यंत शिक्षणात माझी मजल गेली. एक-दोन शिक्षण शास्त्रातील कोर्सेस पूर्ण केले आणि नशिबानं साता-यातल्या छोटयाश्या चाळीत माझा संसार स्थिरावला. सुट्टीत इतर काही ट्रेनिंग कोर्सेसनी माझा जीवनक्रम पूर्ण वेढला गेला आणि गावाकडं जाणं लांबणीवर पडू लागलं. आई साता-यात माझ्याजवळ राहाण्यास तयार नव्हती. तिला गाव सोडायचं नव्हतं. साहजिकच कधीमधी तिला भेटायला जायचो. तेवढंच माझं गावी जाणं होत असे. गावात गेल्यावर एकदा तिची ख्वालीखुशाली विचारली, तिचं कमीजास्त पाहिलं की विलासरावाबरोबर त्यांच्या गावउचापती पाहात आणि ऐकत हिंडायला मी मोकळा. प्रत्येक खेपेला एका रात्रीचं फर्मास जेवण आणि रसाळ हकीकतींचा रतीब किशाकाकाकडं असायचाच.
आता मीही मिळवता झालो होतो. आजवर इतक्या वेळा किशाकाकाकडं गेलेलो, साहजिकच किशाकाकाला माझ्याकडं येण्याचा आग्रह करी. किशाकाका विलासरावाबरोबर नक्की येण्याचं कबूल करी, पण कधी फिरकत नसे. विलासराव या ना त्या निमित्तानं माझ्याकडं येत असे. किशाकाकाच्या हातच्या कालवणाची चवच अशी होती, की मी मात्र गावात आल्यावर त्याच्याकडचा रतीब चुकवत नसे.

बाजाराचा दिवस होतं. शाळा सकाळची. शेवटच्या तासाला शिकवत होतो. इतक्यात शाळेचा गडी वर्गाशी आला आणि ताबडतोब घरी बोलावलं असल्याचा निरोप त्यानं दिला. त्यातूनही ‘एवढा तास सुटल्यावर येतोच आहे’ असं सांगण्याचा मी प्रयत्न केला; पण घरून ‘असाल तसे’ येण्याचा निरोप असल्याचं कळलं आणि मग मात्र दम धरवेना. ‘गुरुजींच्यावर काहीतरी संकट आलेलं दिसतंय, वेळ पडल्यास मदत असावी’, या भावनेनं सातवीच्या वर्गातील सात-आठ पोरं मला न सांगता माझ्या मागोमाग निघाली. मी तडक घर गाठलं; तर अंगणात आमच्या दारासमोर चाळीतल्या पोरांची ही गर्दी उसळलेली. बायामाणसं दोन – चाराच्या गटानं दारासमोर यायच्या, तोंडाला पदर लावून खुसखुसून पुढं व्हायच्या. अंगणातल्या उंबराच्या पारावर रिकामटेकडी बाप्ये मंडळी टेकलेली आणि उगंच अधीमधी ‘गपा रं पोरानो’ असं पोरांना शांत करून आतलं संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत होती. गर्दीतून वाट काढत दाराच्या आत पोचायला मलाच पाच-सात मिनिटं लागली. काय झालं असावं याचा मला काहीच अंदाज येईना. आत गेलो तर व्हरांडयातल्या बाजल्यावर विलासराव सिगरेट फुंकत बसलेला.
“काय झालं रे?” घाब-याघुब-या मी.
“काय न्हाई पाहुण्यास्नी घिऊन आलोय.”
“कोण पाव्हणं रं?” मी पुन्हा विचारलं.
तोपर्यंत बाहेरची पोरं चेंगराचेंगरी करत थेट दाराच्या आतपर्यंत येऊन भिडली होती.
“ए ऽऽ, चला, चालू लागा आपापल्या घरी. थोबाड फोडीन एकेकाचं आता दाराशी थांबलात तर!” उसनं अवसान आणलेला मी ओरडलो.
पोरं पळाली, पण दारासमोर थोडं अंतर टाकून तशीच बाहेर रेंगाळली. मला पटकन काय करावं काही सुचेना. मी धाडकन दार लावून घेतलं आणि आत गेलो. मधल्या खोलीत कुणीच नव्हतं. आत स्वयंपाकघरात गेलो. स्वयंपाकाच्या ओट्याशी किशाकाका भाजी चिरत उभा होता.
“काय किशाकाका.... केव्हा आलात?”
“झाला की घंटाभर.”
मी चाहूल घेतली. बायकोचा कुठंच पत्ता दिसेना. मला काय बोलावं ते सुचेना. त्यातही स्वतःला सावरून म्हटलं, “बरं झालं एकदा आलात ते आणि ‘ही’ कुठे गेली? तुमची गाठ पडली की नाही?” मी विचारलं.
“आमी आलो तवा घरीच होत्या की... विलासरावानं वळखबी करून दिली. त्यांनी चांगला चा करून दिला आणि दळण घिऊन येते म्हणून भायेर गेल्या. दळनाला बराच उशीर लागलेला दिसतोय. तवा म्हनलं निसतं बसून तरी काय करायचं? म्हनून भाजी करायला घेतली. म्हनलं आपल्या हाताची टेस तरी बघूद्या त्यास्नी!”
हातवा-यांत आणि अंगविक्षेपांत भलतीच भर पडल्याचं मला जाणवलं. आता काही इलाज नव्हतं. आल्या प्रसंगाला तोंड देणं भाग होतं.
“आरे, पण... आल्या आल्या तुमी कशाला लागायचं कामाला काका? माझी बायको सगळं करील की!”
“आरं, वैनींची वळख आता होत असली तरी तुजं घर मला परक हाय का?”
“तसं नव्हे काका पण...”
“पन नाही आणि बिन नाही... जा, भायेरच्या खोलीत तुझ्या मित्रासंगत बोलत बैस जा. वैनी घरी यायच्या आत फर्मास भाजी तयार करून ठेवतो.”
एका दृष्टीनं शक्यतो किशाकाका आत राहिलेला मला हवाच होता. मी व्हरांडयात आलो. दबक्या आवाजात विलासरावाशी बोलू लागलो, “आरं, विल्या, एकदम कसा काय रे उपटलास? आणि तेपण किशाकाकाला घेऊन?”
“मग? त्यात काय झालं? परत्येक वेळेला तूच किशाकाकाला तुज्याकडं यायचा आग्रह करीत नव्हतास का?”
“आरे, पण ते सगळं आपलं रीत म्हणून बोललो, तू ते काय खरं धरून बसलास काय?”
“वा रे बहाद्दर! ही तुमची शहरी चाल आमा आडाण्याच्या लक्षात येना. मला खरंच वाटलं त्ये.” विल्या पक्का ब्येना – हे मला लहाणपणापासून माहीत होतं.
“राहुदे त्ये आता आलाच आहात तर. पुढचा काय बेत तुझा?”
“काय काळजी करू नकोस. जेवण झाल्या-झाल्या मी जाणार आहे कलेक्टर कचेरीत आणि मग तसाच गावी जाईन.”
“आणि किशाकाका?” माझ्या घशात आवंढा अडकला.
“राहिल की दोन-चार दिस आरामशीर हितंच. तूच त्याला म्हनला होतास न्हवं. येईल मागून गावाला, हितं कटाळा आल्यावर!”
“हे बघ विल्या, पाया पडतो तुझ्या. परतीच्या भाड्याचे, पायजे तर टॅक्सीचे पैसे देतो तुला, पण किशाकाकाला तेवढं परत घेऊन जा.”
“मला आणि किशाकाकाला एका टॅक्सीत आलेलं बगून गावात वरातच काढत्याल की आमची!”
“आरं, बघतोस तू ...घंटाभरातच माझी एवढी अब्दा झालीय.दोन चार दिवसांत काय अब्रुची दैना होईल याचा जरा विचार कर रे!”
विल्या मिश्किलपणे हसला आणि माझी काकुळती बघून, दया येऊन शेवटी म्हणाला, “बरं,बघतो कसं जमतंय ते. तू काय काळजी करू नगोस.”
विल्याकरता ठेवलेला पाण्याचा तांब्या मी उचलला आणि तसाच तोंडाला लाऊन गटागटा संपवला.
तोवर बाहेरून दार वाजलं आणि बायकोची हक आली, “आलात का हो ! मी आहे...दार उघडा.”
बहुतेक मी घरी आल्याची खात्री करून घेऊनच ती आली असावी. आता आणि कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय या भीतीनं मी हळूहळू दार किलकिलं केलं. बाहेर चाळीतल्या पोरांची ही झुंबड उभी. धाडदिशी दार जोरात ढकलून बायको आत आली. तिच्या हातात दळणबीळण काही न्हवतं. माझ्याकडं एक जळजळीत कटाक्ष टाकून दाणादाण पावलं टाकत आत निघून गेली. मीही अपराधी चेहऱ्याने तिच्या मागोमाग आत गेलो.
आता किशाकाका भाकऱ्या बडवत होता. हसत म्हणाला,” वैनी, गिरणीत गर्दी असणार...वाटलंच मला तुमाला उशीर झाला तशी....म्हणलं कणीक न्हाय तर न्हाय...भाकरीचं पीठ होतं की या डब्यात... म्हणलं तवर साताठ भाकरी टाकून घ्याव्या. त्याला काय उशीर...ही शेवटचीच बघा भाकरी. वैनी, पानं घ्या.”
हिनं निमुटपणे पानं घेतली. विलासरावाला हाक मारली. किशाकाका म्हणाला, “ मी आणि वैनी मागून बसतो. तुमी दोघं घ्या आधी जीउन!” मी आणखीच अवघडलो.
किशाकाकाला आमच्याबरोबर जेवायचा आग्रह केला. त्यानं माझ्या बायकोला केला. कधी नव्हे ते आम्ही चौघंही एकदम जेवायला बसलो. वांग्याचा रस्सा म्हणजे अगदी मटण रश्याच्या तोंडात मारील असा झाला होता. फारशी बोलणी झाली नाहीत. पण किशाकाकानं केलेलं जेवण सगळं फस्त झालं. हात धुतले, तशी किशाकाका म्हणाला, “ चला विलासराव... तुमची कामं आटपा मीबी येतो बरोबर. तसचं स्टॅन्डवर जाऊ!”
“का हो किशाकाका? आलात तसं रहा की दोन दिवस!” कितीही सहजपणा आणला तरी माझ्या बोलण्यात मानभावी खोटेपणा होता हे मला मान्य होतं. मी बायकोकडं बघितलं. तिलाही माझ्या बोलण्यातली कृत्रिमता जाणवली होती. ती काहीच बोलली नाही.
“छ्या... छ्या! येडे का खुळे तुमी प्रोफेश्वर!... आवं, गेल्या पस्तीस वर्सांत यात्रा सोडली तर कंदी गावातला, आपल्या घरातला मुक्काम नाही चुकवला. तसं कुटं चैन पडतं का काय? हितं आलो, तुमचा सुखाचा सौंसार बगितला, ह्येच खूप पुन्य आमचं... चला, आटपा विलासराव.”
अंगणातून पाठमो-या जाणा-या किशाकाकाकडं बघत राहिलो. क्षणार्धात त्याच्या माझ्या परिचयाचा चित्रपट माझ्या नजरेसमोर उभा राहिला. खरंच किशाकाकानं नुसतंच खाऊपिऊ घातलं होतं किंवा वेल्हाळ गोष्टी सांगितल्या होत्या असं नव्हे, त्यानं तशी मायाही लावली होती. अनेकदा आई रागावली, शिक्षकांनी वर्गात पाणउतारा केला तर किशाकाकानं हळुवारपणानं माझ्या मनातली अढी काढली होती. विशेष म्हणजे असा काही प्रसंग आला तर त्या रात्री मी हमखास किशाकाकाकडं जात असे. कॉलेजात कधी एखादया मुलीबद्दल आकर्षण वाटल्यास, ‘आब्यासाचं पयलं बगावं माणसानं’ हे मनावर पक्कं ठसवायचा किशाकाकानंच प्रयत्न केलेला.बरं कोणत्याही वेळी त्याच्या समजावण्यात अभिवेष नाही, उपदेशाची आढ्यता नाही, किंबहुना हलक्याफुलक्या आणि समयोचित चुटक्यांनीच त्यानं मनातलं मळभ दूर केलेलं. नोकरीला लागल्यावरही एकदाच मी जेवणाचा खर्च(निदान मटणाचा) देण्याचा प्रयत्न करताच, ‘व्वा श्रीमंत!... त्यापेक्षा आमालाच घ्याकी इकत!’ असं बोलून तेही नाकारले.
लोकांच्यादेखत कधीही सलगी न दाखवून मला ओशाळवाणं होऊ न देण्याची खबरदारीही त्यानं आजतागायत घेतली होती. मीच चारचारदा माझ्याकडं येण्याचा त्याला आग्रह केला होता आणि आज मात्र माझ्या मूर्ख प्रतिष्ठेच्या वाटेत किशाकाका आल्याचं मला वाटलं होतं. खरंच किती कृतघ्न मी! डबडबलेल्या डोळ्यांतून अस्पष्ट झालेली त्याची पाठमोरी मूर्ती दिसेनाशी झाल्याचं भानही मला राहिलं नाही. सावध झालो तो मला बिलगून, माझ्या पाठीवर सांत्वनाचं थोपटणा-या बायकोच्या स्पर्शांनं मला काय बोलावं ते सुचेना. तिच्या हातांच्या तळव्यात तोंड खुपसून ढसाढसा रडून घेतलं. उमाळा कमी झाल्यावर तिला म्हटलं, “फार माया केली गं किशाकाकानं माझ्यावर... आजपर्यंत हे जाणिवेतही नव्हतं. आज कळलं, पण तुझी कुचंबणा नको म्हणून मी त्याला कटवलं.”
“माझी कुचंबणा? हो! खरंच तुम्ही करून टाकलीत. इतकी वर्षं झाली लग्नाला, पण तुमच्या या आप्ताबद्दल एक अवाक्षरदेखील कधी काढलं नाहीत माझ्याजवळ. एकदम घरात आलेल्या अशा माणसाबद्दल माझी दुसरी कुठली प्रतिक्रिया झाली असती? सांगा नं!... खरी कुचंबणा आणि अवघडलेपण आलं तुम्हाला. दोन दिवस त्यांना ठेवून घेण्याची हिंमतपण झाली नाही तुमची.” अवाक् होऊन मी तिच्याकडं पाहात राहिलो.
अपराधी भावनेनं पुढं अनेक दिवस मी गावी जायचं टाळलं. मधे एक-दोनदा आईलाच साता-याला बोलावून घेतलं. अशाच एका सुट्टीत आई आजारी असल्यानं तिला येणं शक्य नसल्याचं कळलं. मी गावाकडं गेलो. या खेपी किशाकाकाचे पाय धरून माफी मागायची ठरवलं होतं.
सकाळी सकाळीच किशाकाकाचं घर गाठलं. बाहेरच्या भिंतीला टेकून, पाय पसरून तो ऊन खात बसला होता. सवयीनं बाकी पोशाखात फरक नसला तरी चेह-यावर पांढरी दाढी खुरट वाढली होती. डोक्यावरचे केस पिकले होते. त्यांचा कुरळेपणा नाहीसा होऊन बरेच मागं हटले होते. किशाकाका म्हातारा झाल्याचं जाणवलं. मला बघताच... ‘येरे... येरे... लेकरा...’ असं म्हणून त्यानं घोंगड्याचा पुढचा पदर पसरला.
मी किशाकाकाचे हात हातात धरले. आता कोण बघतंय आणि काय म्हणतंय याची मला पर्वा नव्हती. किशाकाकाचे डोळे ओलावल्याचं मला जाणवलं. माझे हात थोपटत मला म्हणाला, “चंदूशेठ... काय विलाज न्हाय त्याला. कोनत्या जल्मीचं पाप कोन जाने! परमेसर देतो शिक्षा एकेकाला. बोल कुनाला लावणार? त्यातल्या त्यात एक बरं – मोठया भावकीत जन्माला घातलं त्यानं! लहानपणीच आई-बाप दोगंबी वारली. भावकीची अडचण नको म्हणून मूळ घरापासून चार हात लांब या दोन खोल्या बांधून राहू लागलो. मी असा नामर्द, माझ्या हातनं कायीच धंदापानी, शेती होण्याचं लक्षन न्हाई. भावकीनंच घेतली माझी वाटनी आपल्या ताब्यात; पण एक मातर खरं, जनमभर मला लागणारे कपडे-लत्ते, मला खर्चाला लागणारा पैका, कधी बी कमी पडू दिला नाय. बरं, भावकीत म्हाईत, मला चार-सहा कपड्याच्या जोडांखेरीज आनखी कशाची हौस न्हाई... आणि माणसांना बोलावून चांगलं कालवन खायला घालण्याबिगार दुसरं व्यसन न्हाई. त्यांनी ते मात्तर कदी कमी पडू दिलं न्हाई. –हाता –हायला माणसांची माया... ती ज्या वयात हवी असती त्या वयात वरून दाखवत नसली, तरी समद्यांनी झिडकारलं... कुनीबी मायेच्या उबंला न्हाई उबं केलं. त्येबी माझ्या अंगवळणी पडलं. म्हनलं, जगानं न्हाई माया केली तरी आपण जगावर करायची आणि माझी जगण्याची उमेद वाडली.
पण खरं सांगू लेकरा, आता गाडं थकलं. न्हाई होत पयल्यासारकी उपसाभर! हितंच बसून असतो. गुडगं बी दुकाय लागल्येत मस्त. काय करावंसंच वाटत न्हाई. भावकीतलं कोनी नं कोनी रोज भाकरटुकडा पोचिवत्यात. वर चार पैसं बी पाठीवत्यात. जगाचं चाललंय तसंच चाललंय. माजी बी माया करण्याची शक्ती संपून गेलीया. चंदूशेठ, तुमी का आलायासा त्ये मी वळखलं. पन माज्या मनात आता कायबी रागलोभ न्हाई... तुमी हितवर आला, भरून पावलो. जा तुमी आता.”
किशाकाकाच्या बोलण्यात कुठंही कडूपणा नव्हता. विखार नव्हता. मला माझ्याच वागण्याचा विखार चरचरून झोंबत गेला. पुढं बोलण्यानंही काही फरक पडणार नव्हता. उठलो. घराकडं निघालो. पायात मणामणाच्या बेडया घेऊन....
**************************************************************************
लेखक
श्री रवींद्र जोशी पुणे.
ही कथा श्री रवींद्र जोशी यांच्या ‘गावरान गोष्टी’ या कथासंग्रहात प्रसिद्ध झाली असून मूळ लेखकांच्या लेखी पूर्वपरवानगीने या ब्लॉगवर ‘अरुणोदय’ च्या वाचकांसाठी प्रसिध्द केली आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. **************************************************************************