Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Saturday 3 April, 2010

पेन्शन

लेखक-ज्ञानेश्वर कोळी
सकाळचे ११ वाजले आणि नेहमी प्रमाणे ऑफिसचे कामकाज सुरु झाले.ऑफिसमध्ये काही शिपायांच्या जागा भरायच्या असल्याने नोकरीसाठी गेटवर ताटकळत बसलेल्या रामूला साहेबांनी हाक मारली. रामू लकवा भरल्यागत साहेबांसमोर येऊन उभा राहीला. सत्तेची आणि लाचारीची ओळख ऑफिसच्या दरवाजातच आली. रामू आत येताच साहेबांनी आपल्या कॅबिनचे दार बंद केले. दार बंद करताच रामू जरा दचकलाच. तोपर्यंत साहेबांनी गोल फिरणाऱ्या खुर्चीवर बसून खुर्ची गर्रकन वळवून हात बांधून उभा असलेल्या रामूला म्हणाले, “हात खाली घे आणि सरळ उभा राहा”.
रामू साहेबांची आज्ञा संपण्याच्या आताच सावधान स्थितीत उभा राहीला. “हे बघ रामू! आजपासून आम्ही शिपाई म्हणून तुला कामावर घेत आहोत. तुला दर महिन्याला २०० रुपये पगार मिळेल.” साहेबांचे मधुर कनवाळू शब्द ऐकून रामूचे अंतःकरण आयाळ भरून आल्यासारखे भरून आले आणि रखरखीत वाळवंटात पावसाच्या सारी पडाव्या त्याप्रमाणे रामूच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. साहेबांचे केवढे मोठे उपकार! किती दयाळू साहेब म्हणायचे! ही सारी कृतज्ञता रामू आपल्या केविलवाण्या चेहऱ्यातून प्रगट करीत, भिंतीवर लावलेल्या महात्माच्या फोटोला हात जोडत होता तेवढ्यात साहेब म्हणाले, “उद्यापासून प्रथम तात्यांच्या घरची काय कामे असतील ती करायची आणि त्यानंतर आमच्या घरात पाणी, भाजीपाला, दळप आणून द्यायचे आणि १० वाजता ऑफिसमध्ये येऊन ऑफिस झाडणे, पुसणे, व इतर कामे करायची.ही सर्व कामे हातच्या मळासारखी समजून रामू उद्याच्या दिवसाची वाट पाहू लागला. ऑफिसात शिपाई म्हणून काम मिळाल्याने रामूला आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ठरल्याप्रमाणे रामू दुसऱ्या दिवसापासून आपल्या कामाला लागला. जगाप्रमाणे रामुलाही फक्त पोटाचाच ध्यास लागला होता. मग ते कसे का भरेना! याच्यापलीकडे तो जाऊही शकत नव्हता.
रामू दिवस उगवायच्या आतच सार्वजनिक पाण्याच्या नळाचा आवाज ऐकून तात्यांच्या घरी कामाला गेला. आणि पुरे दोन तीन तास काम करून ९ वाजण्याच्या सुमाराला परत येऊन आपल्या साहेबांच्या घरी कामाला गेला. सकाळच्या ताज्या, टवटवीत वातावरणातही रामू पिळून निघाल्यासारखा दिसत होता. असलं काम किती दिवस करायचं? नकळत प्रश्न रामूच्या मनाला चाटून गेला.
ऑफिसमध्ये रामू पाय गुडघ्यात वाकवून कावळ्यासारखी चौफेर नजर टाकीत स्टूलवर बसायचा आणि दमलेल्या मनाला म्हणायचा, आपणही मेट्रिकच्या परीक्षेला बसावं, पास व्हावं, टायपिंगचं कोर्स करावा. मग पगार वाढेल, बढती मिळेल आणि रिटायर होताना पेन्शनही भरपूर मिळेल. म्हातारपणी आपल्याला कशाचाही आधार न्हाय. निदान पेन्शनवर तरी काही दिवस जगू. अशा थोड्याफार सुखी जीवनाची स्वप्ने रामू चार पायांच्या स्टुलावर बसून रंगवायचा.पण रंगवलेल्या स्वप्नांचे रंग केंव्हाच उडून जात होते हे रामूला कळत नव्हते.
रामूला नोकरी लागून दोन तीन महिने होऊन गेले पण पगाराचा अजून पत्ता नव्हता. रामू अधून मधून साहेबांना म्हणायचा,
“सायब! माझा पगार कवा करताय?” तेंव्हा साहेब म्हणायचे,
“अरे. अजून तुझी मंजुरी यायची आणि मग तुझा पगार.”
त्यावर पुन्हा रामू म्हणायचा, “कवा यायची मंजुरी?”
“एकदोन दिवसात येईल आणि साधारण एक तारखेपर्यंत तुझा पगारही येईल”.
तेंव्हा पासून रामू मोठ्या आशेने एक तारखेची वाट पाहू लागला. दोन घरची कामे उपसत उपसत उगवलेला दिवस मावळलेलाही रामूला कळत नव्हता. अजून आपून किती दिवस जगणार? पोरांची खाती तोंडं झाली. पोरगी लग्नाला आली. आता कसं करायचं अशा अनेक प्रश्नांची उकल रामू सोडवित असताना साहेबांनी रामूला हाक मारली आणि म्हणाले, “ तुझा पगार आला आहे. त्या कांबळेना जरा इकडे बोलावून आण आणि तू बाहेरच थांब.” तीन महिन्यांचे सहाशे रुपये मोजायचे म्हणून रामू एकदम खुष झाला.
“साहेबांनी तुम्हाला बोलावलंय”
कांबळे चट्कन उठून साहेबांच्या केबिनमध्ये गेले आणि साहेब हळू आवाजात कांबळेला म्हणाले,
“रामूचा दर महिन्याचा पगार किती?”
त्यावर कांबळे म्हणाले, “पाचशे पंचवीस!”
“मग त्याचा चार महिन्यांचा फरक किती जमा झाला?”
“दोन हजार शंबर” कांबळेने मोठया अमिषाने सांगितले.
“हे रामूला कळू देऊ नका. त्याचे बँकेत खाते उघडा ! आणि त्याची कोऱ्या चेकवर सही घेऊन त्याचा दोन महिन्याचा चारशे रुपये पगार देऊन टाका.”
रामू हे सर्व ऑफिसात दुसरं कोणी नाही म्हणून दाराच्या फटीला कान देऊन ऐकत होता. असं ऐकू नये हे मनोमन वाटायचं पण ऐकल्या शिवाय राहवत न्हवतं. रामूने स्वार्थाने बरबटलेल्या साहेबांचा डावपेच ओळखला. सगळेच अधिकारी एकाच सांस्कृतिक कळपातले. माझ्यासारख्या दुर्बल मनाच्या हजारो नाड्या आपल्या हातात ठेवणारे हे लाळघोटे समाजात प्रतिष्टा मिळवतात.अशा अनेक तडकाफडकीच्या प्रश्नांची उतरंड रामूच्या मनात चढत होती पण अनुभवाचे चटके आणि भुकेले पोट यामुळे ती उतरंड ढासळून जायची. उद्या जगायचं कसं? ही एक भीती त्याच्या पोटात कायमचं घर करून राहिली होती.
रामूला साहेबांच्या कपटीपणानं क्षणभर गोंधळ्यासारखं झालं. ऑफिसात महात्मा फुले, आंबेडकर, भगतसिंग या महामानवांचे भिंतीवर टांगलेले फोटो वादळात सापडून गरागरा फिरल्यासारखे दिसू लागले आणि त्या तंद्रीतच फोटो पडला म्हणून रामू एकदम ओरडला. साहेबांनी रामूचा आवाज ऐकताच साहेब रामूच्या अंगावर धावूनच गेले.
“तुला काय वेड बीड लागले की काय?”
“तसं न्हाय सायब! मला जरा चक्कर आल्यासारखं झालं बघा. पण एक सांगू साहेब?” रामू जरा अदबीनं बोलला.
“हं! काय म्हणतोस सांग”
“हे बघा सायब, इतकं काम करून मला तुम्ही दोनशे रुपये देता आणि बाकीचं तुमी घेता. आसं किती दिवस चालायचं?” वाघ चवताळल्यागात साहेब रामुवर चवताळले,
“हरामखोरा, तुला नोकरीवर घेतला म्हणून मस्ती आली वाटतं! तुला नोकरी करायची आहे का घरी जायचं आहे? रागाने लाललाल झालेल्या साहेबांचे विस्तावासारखे चटके देणारे शब्द ऐकताच गान्डुळासारख्या वळवळणारया रामूच्या वेदना जिथल्या तिथं थंडावल्या आणि रामू आपल्या कामाला लागला. बघता बघता रामूला नोकरी लागून तीन वर्षे होऊन गेली.तीन वर्षात रामुकडून सात ते आठ हजार रुपये साहेबांनी काढून घेतले.शेवटी रामूने गोचीड चिकटल्यासारखे साहेबांचे पाय घट्ट धरले आणि रामू साहेबांच्या पायावर ढसाढसा रडू लागला. डोळ्यातल्या पाण्याने साहेबांचे पाय धून निघाले आणि साहेबांची वाळून गेलेली माणुसकीची माती थोडीफार ओलावून दयेचा अंकुर फुटला आणि रामूला ते नियमाप्रमाणे पगार देऊ लागले. लाचारीने डबडबलेला रामूचा चेहरा पुन्हा फुलला. वाक म्हंटलं तिथं वाकू लागला. तात्यांच्या आणि साहेबांच्या घरची कामं न चुकता करू लागला. त्यामुळे रामू आपल्या घराला जवळजवळ वंचितच झाला होता. कारण तेवढाही वेळ त्याला मिळत नव्हता. पहाटे पासून रात्री अकरा वाजेपर्यंत रामू कायम कामातच असायचा. त्यामुळे थंडीतापासारखे आजार अंगावर काढून दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला. त्याला घाणेरडे कामही नकोसे वाटू लागले होते. पण इलाज नाही. ना घर आपल्याला, ना जमीन, ना कुणाचा आधार.त्यात कशीतरी नोकरी मिळाली आहे. त्यातून म्हातारपणी पेन्शन मिळेल. असा विचार रामू करत होता. आता आपलं किती आयुष्य रहायलयं? मुलाबाळांसाठी काहीतरी केलं पाहिजे. निम्यावर आयुष्य शेणघाणीतचं गेलं. पुढे रामू तात्यांच्या आणि साहेबांच्या घरी कामाला जायला टाळाटाळ करू लागला.
झालं, एके दिवशी तात्या ऑफिसात आले. तात्या ऑफिसात येताक्षणीच आपली जागा शाबूत ठेवण्यासाठी इतर अधिकारी, “या तात्या, या तात्या, ‘ म्हणून लाळ घोटू लागले. त्यातून एकजण म्हणाला, “तात्या चहा आणू?” तेव्हा तात्या म्हणाले, “ त्या राम्याला इकडे बोलाव” तात्यांच्या तोंडून शब्द निघेपर्यंत अवकाश, साहेबांनी रामूला तात्यांसमोर आणून उभा केलं. तशी तात्यांनी रामुवर रागाचा योट काढायला सुरवात केली,
“काय रे ए भडव्या! हे काय ऑफिस आहे काय रे? नालायका कधी ओल्या फडक्याने पुसून घेतलंय काय? आणि हे फोटो पुसले आहेत का कधी? हजार रुपये पगार घेता, तुम्हाला लाजा नाही वाटत. मस्ती आलीय रे तुम्हा लोकांना.” तात्या मध्ये दम खावून साहेबांना म्हणाले, “ या भडव्याची इन्क्रिमेंट बंद करून मेमो द्या म्हणजे कमी करून टाकू.” पहाड कोसळून शेवग्याच् झाड भुगा व्हावं तशी रामूची अवस्था झाली.
तात्यांच्या घरी गेली दोन तीन महिने कामाला न गेल्याने ही बोलणी खावी लागली हे रामुखेरीज कोणाच्याच लक्षात आले नाही. येणार तरी कसं? कारण इतरांना अशी कामं करायचा कधी प्रसंगच आला नाही. परंतु रामूला हे बोलता येत न्हवतं. सत्तेपुढं काही चालत न्हवतं आणि माणुसकी तर गटारीतून केंव्हाच वाहून गेली होती.
घरट्यातील पाखरं भरभर उडून जावीत त्याप्रमाणे रामूच्या आयुष्यातले दिवस भराभर जाऊन रामूला नोकरी लागून वीस वर्षाचा काळ निघून गेला. रामू उतार वयाला लागल्याने थकून गेला होता. चेहऱ्यावर सुरकुत्यांच जाळ, ठिकठिकाणी हात वाकलेले, इतक्या वर्षात स्वतःला राहण्यापुरते घरही बांधू शकला नाही. पगार कमी, दिवस महागाईचे, घरात खाणारी मोठी तोंडे, त्यात रामू हाच कर्ता आणि केवळ म्हातारपणी भीक मागायची पाळी येऊ नये या एकाच सूज्ञ विचाराने रामू ऑफिसात शिपुर्डा म्हणून कामाला लागला होता. कारण रामूला पेन्शन मिळणार होती. पण रामूचं उभं आयुष्य मोगलांच्या घोड्यासारखा पाणी पिण्यातच गेलं. रामू झोपेतच तात्यांना आणि साहेबांना ‘जी’ म्हणून दचकायचा. पुन्हा उठायचा आणि कामाला लागायचा.
बघता बघता रामूच्या आयुष्याची साठी उलटून गेली.स्वतःची उपासमार करून झीजलेला रामू साठाव्या वर्षी आपल्या कामातून रिटायर झाला. लाचारी, गुलामगिरी आणि नाईलाजास्तव करावी लागणारी चमचेगिरी या अनेक साखळदंडातून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यासारखे रामू स्वतंत्र झाला. पण त्यावेळी रामुमध्ये ना स्व राहीला होता ना तंत्र. रामू रिटायर झाल्याने साहेबांनी रामूला ऑफिसात बोलवून पेन्शनची कागदपत्रे तयार करणेसाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. रामू कळवळून म्हणाला, “काय साहेब , अजूनही तुम्ही या मढयाला छळताय?”
रामूचे निर्विकार बोलणे ऐकून साहेब म्हणाले, “ असं कर, तू जा आता. तुझी कागदपत्रे आम्ही तयार करतो.” झालं, रामूला रिटायर होऊन पाच सहा महिन्यांचा काळ लोटला. केवळ पेन्शनच्या आशेवर जगणाऱ्या रामूला पेन्शन तर नाहीच, पण मिळणारा पगारही नसल्याने रामूची फारच उपासमार झाली होती. दिवसेंदिवस अशक्तपणा वाढतच गेला. काठीच्या आधाराशिवाय चालता येत नव्हतं, डोळ्यांना नीट दिसत नव्हतं. मध्येच डोळ्यातून खळ्कन पाणी येऊन डोळ्याफूड अंधारी यायची. अश्या अवस्थेतही रामू भेलकांडत भेलकांडत ऑफिसकडे पेन्शनसाठी येरझाऱ्या घालत होता. तीन तीन तास रामू ऑफिसच्या दारात ताटकळत बसायचा, पण त्याची कोणीही दाद घेत नव्हते. कारण पेन्शन आली तरी त्यास सांगू नका अशी सक्त ताकीद गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना तात्यांनी दिली होती.त्यामुळे प्रत्येकजण आपापली जागा शाबूत ठेवत होता.परंतु रामूचा जीव पेन्शनसाठी पाण्याबाहेर काढलेल्या माश्यासारखा तडफडत होता.शेवटी कशीतरी साहेबांची भेट घेऊन डोळ्यात जीव आणून रामू साहेबांना म्हणाला, “ साहेब, माझ्या पेन्शनच तेवढं बघा की, लय हाल होत्यात पोटाचं. तेव्हा साहेब वरकरणी म्हणाले, “येईल एकदोन दिवसात. आली की तुला आधी कळवतो.” एवढं ऐकून रामू हातात काठी घेऊन गुडघ्याच्या वाट्या कटाकटा वाजवत घरी परतायचा. तीन वर्षे झाली तरी त्याला अजून पेन्शन मिळाली नव्हती.पेन्शन पेन्शन म्हणून रामू रात्रंदिवस घोकायचा. उपासमारीने रामू थकल्याने अनेक रोग ताच्या शरीरात कायमचे वस्तीला आले होते. त्यातच दम्याच्या खोकल्याने त्याचं शरीर जवळजवळ काबीज केलं होतं. खोकल्याची एक एक जीवघेणी उबळ यायची. रामूला औषध घेणं फार गरजेचं होतं, पण जीथ चहापाणी मिळत नाही तिथं औषध कोठून मिळणार? बरं विष खाऊन आत्महत्या करावी म्हणलं तरी विष कोठून आणायचं? त्यालाही पैसे लागतात. या विचारातच खोकल्याची उबळ थोपवीत रामू सकाळच्या उनाला दारातच डोके गुडघ्यात खुपसून बसला होता.सकाळचे नऊ दहा वाजले असतील तेवढयात पोस्टमन रामूच्या दारात आला आणि म्हणाला, “ रामुदादा! तुमची पेन्शन मंजुर झाली आहे, म्हणून एक लखोटा रामूच्या हातात देऊन पोस्टमन निघून गेला. रामूचा जीव सुपाएवढा झाला आणि त्याचवेळी सुपाएवढी रामूला खोकल्याची उबळ आली.खोकल्याची उबळ थोपवीत “बरं झालं बाबा! देव हूनच आलास बघ! असं म्हणून रामू लखोटा घेऊन पेन्शन आणण्यासाठी ऑफिसकडे निघाला. जीर्ण झालेल्या अंगाचा नुस्ता हाडांचा सापळा राहीला होता.चालता चालताच रस्त्यातच धाप लागून खोकल्याच्या उबळी येऊ लागल्या.सारं अंग घामागुम झालं. डोक्याला अंधारी येऊ लागली.डोळ्यांची उघडझाप करीत रामू कसातरी ऑफिसच्या दारात आला.तेवढयात साहेब म्हणाले, “ या रामभाऊ!” उभ्या आयुष्यात ‘रामभाऊ’ नावाचा शब्द रामूने ऐकला नव्हता.पण आज ‘रामभाऊ’ म्हणून साहेबांनी हाक मारल्याचं समाधान वाटलं. पण ते समाधान खोकल्याच्या उबळीनं हिसकावून घेतलं.खोकता खोकता हातात पेन्शनचा लखोटा घेऊन रामू जमिनीवर पडून शांत झाला.
साहेबांच्या तोंडून बाहेर पडलेला ‘रामभाऊ’ हा शब्द ऐकूनच रामूने ‘राम’ म्हटले. रामू पेन्शनीतून सुटला होता.

5 comments:

  1. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे....कोण मेले कोणासाठी रक्त ओकून..... :( असे दुर्दैवी जीव आजही आहेत याचे अतिशय दु:ख होते. दुस~याच्या नरडीचा घोट घेऊन स्वत:चे घर चालवणारे लोक...
    कथा चांगली आहे.

    ReplyDelete
  2. पाणी आलं डोळ्यामध्ये .

    ReplyDelete
  3. धन्यवाद !!

    KeeP PoStInG :-)

    ReplyDelete
  4. khup khup chan mitra...... ajun kahi mast liheto na......keep it up.....

    ReplyDelete