Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Thursday, 20 May 2010

फिष्ट


लेखक-हिंमत पाटील
दिवस तसे सुगीचे होते. ऊन मी म्हणत होतं, कडाक्याच्या उन्हामुळं अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. रस्त्यावर एखादं चिटपाखरूही दिसत नव्हतं. उन्हाच्या झळा एकसारख्या मारत होत्या. शांत पाण्यात मुठभर खडे टाकल्यावर जशी अनंत वलयं दिसतात, तशी दुर-दुरच्या सा-या शिवारात उन्हाच्या झळांची वलयंच वलयं दिसत होती.
दुपारची वेळ होती. गाव शांत होतं.उकाड्यामुळं घराघरातून विजेचे पंखे एकसारखे घरघरत होते. ज्यांच्या घरात पंखे नव्हते आणि ज्यांच्या घरात पंखे असुनही जास्त गदगदत होतं, अशी माणसं घराबाहेर होती. आप-आपल्या ठिय्याप्रमाणं! कुणी चावडीत, कुणी देवळात तर कुणी पारावरच्या लिंबाच्या झाडाखाली. मध्येच चुकून एखादी गार वा-याची झुळूक आली की, तेवढंच बर वाटत होतं. सर्वांगावरून जणु मोरपिसारच फिरविल्याचा भास होत होता.
चावडीपाठीमागील बाजुसच मराठी मुलांची शाळा होती.पंधरा मिनीटांच्या सुट्टीमुळे त्या शांत वातावरणाला तडा गेला. मुलांचा दंगा आणि आरडाओरडा सगळ्या वातावरणात घुमू लागला. शाळेसमोरच अपु-या बांधकामाची पाण्याची टाकी होती. काही उनाड मुलं त्या पाण्याच्या टाकीवर चढून गप्पा मारत बसली. काहीजण केशवबापूच्या मोकळ्या नव्या इमारतीत खेळू लागली तर काहींनी शेजारच्या कुंभाराच्या दुकानात चणं-फुटाण्यासाठी गर्दी केली होती.
पाटलाच्या नंद्याचा वेगळाच ताफा होता. रस्त्याच्या पलीकडील, पाटोळ्याच्या विहीरीवरील, कळकांच्या बेटाच्या सावलीत त्याचा ग्रुप बसला होता. त्यातील निम्मी-अधिक मुलं हुडच होती. त्यांचा सोबती, ‘पत्त्याचा डाव’ सतत त्यांच्याबरोबर असायचा. तरीही, आज त्यांना पत्त्यात रस नव्हता. त्यांचा आज वेगळाच प्लॅन चालला होतं.
त्या सर्व मुलांचा म्होरक्या नंद्याच होता. तो जी, सांगेल ती पूर्व दिशा ठरत होती. अर्थात त्याच्या अंगी तसे गुण होते. भांडणात पटाईत, बुद्धीने हुशार, बोलणं लाघवी. तो बोलायला लागला तर मग ते खरं असो, खोटं असो वा थापा असोत. समोरच्या माणसाला तो आपलासा वाटे. अगदी चिरून पोटात घालावासा वाटे!
नंद्या म्हणजे तसा औरच मुलगा होता. नदीवर पोहायला गेला की, पाण्यात पडल्यागत दिवसभर तिकडेच. कधी कुणी काही काम सांगितलं की त्या कामाचा बाजाच. काम तर कधी करायचा नाहीच आणि त्यातूनही मनात जर आलं तर, रेड्यावर पाऊस पडल्यागत! काम सांगणा-याला वाटे, त्याला आणायला सांगितलेली वस्तु हा तयारच करुन घेऊन येतोय की काय?
नंद्याच्या बरोबरीची मुलं तालुक्याच्या गावी कॉलेजात शिकायला गेली होती. हा मात्र हाय तिथंच! शाळेत तर तो कधीच हजर नसायचा. त्याच्या घरातील लोकांना वाटे, आपला मुलगा शाळेत जातोय. पण हा तर हजेरीच्या तासापुरताच शाळेत असायचा आणि बाकीच्या तासांना दांड्या मारुन गावात उनाडक्या करीत फिरायचा!
अलीकडं तर त्याला फ़ारच वेगळेच वळण लागलं होतं. रस्त्याच्या वळणासारखं.
या वर्षा दोन वर्षात नंद्याला चोरीच करायची सवय लागली होती. रात्रीच्या वेळी कोणाची शेळी चोरायचा, कोणाची मेंढी पळवायचा आणि वडगावच्या बाजारात नेऊन विकायचा. आल्याल्या पैशातनं मित्रांच्या सोबतीनं मटणाची फिष्ट करायचा. कोंबड्या तर एक दिसा आड चोरायचा. कायमची चार-पाच पोरं जमा करुन, सौदा आणायचा आणि चोरुनच फिष्ट करायचा. हे आता त्याच्या अंगवळणी पडलं होतं.
गावातली आणि जास्त करुन शाळेच्या आसपासची लोकं या त्रासाला कंटाळून गेली होती. पण आपल्या कोंबड्या कोण चोरून नेत आहे हे समजायला त्यांना मार्गच नव्हता. ब-याच जणांची खुराडंच्या-खुराडं रिकामी झाली होती. त्यामुळे गावातील काहीजणांनी त्यावर पाळतच ठेवायला सुरुवात केली. काहीजण तर आपला काम धंदा सोडून त्या पाळतीवरच राहिली होती!
ही बातमी रोडक्याच्या मन्यानं, लगोलगच नंद्याला येऊन सांगितली.
आता फिष्टी कशा करायच्या? या प्रश्नाची उकल शोधण्यातच सर्वजण गर्क होते. मग वेगवेगळे प्लॅन निघत होते. पण पचनी पडेल असा एकही प्लॅन निघत नव्हता. जो तो आप-आपल्या विचारात मग्न होता.
आता इथुन पुढे त्यांना फिष्टी करता येणार नव्हत्या. त्यातूनही त्यांनी कोंबड्या चोरायचा प्रयत्न केला तर ते सर्वजण पकडले जाणार होते.
“नंद्या! आपून आसं केलं तर?” रमज्यानं विचारलं,
“कसं?” नंद्या कसनुसं तोंड करत म्हंटला.
“महीनाभर आपून गप्पच बसल्यालं बरं!”
“पर,तवर त्वांड तर गप्प बसायला नगो व्हय?”
कदमाच्या म्हाद्यानं मध्येच तोंड खुपसलं. त्यावर नंद्याच म्हणाला,
“नाय, रमज्या म्हणतुय त्येच खरं हाय! निदान, महीनाभर तरी कोंबड्या चोरायचं बंद केलं पायजे!”
“तवर फिष्ट-बिष्ट, सारं बंद?” मोहीत्याच्या उतम्यानं असा सवाल करताच रमज्या खवळला.
“अ ऽ ऽ य! तलपवान ऽ अ ऽ ऽ ऽ य!! हाडकावर नंबर टाकलेतीस का? न्हाय म्हंजे मार बसल्यावर, कुठलं हाड कुठं हुतं त्ये तरी समजल!”
त्यावर उतम्या गप्पच बसला. म्हाद्यानं आरसाटा घेतला. म्हंटला, “व्हय लेका उतम्या! रमज्या म्हणतुया त्येच खरं हाय. आता कोंबडी चोरायची मंजी, आदी पाठीला त्यालच लावलं पायजे!”
“आरं गपा रं! लय ऽ ऽ शानं हु नकासा! फिष्टी ह्या करायच्याच पण जरा येगळ्या पद्धतीनं.” नंद्या म्हंटला.
“येगळ्या पद्धतीनं? म्हंजी?” उतम्यानं विचारलं. इतक्या उशीर गप्प बसलेला वाण्याचा केरबा हासतच म्हणाला,
“पयल्या ठेक्याप्रमाणं! चोरायचं एखादं शेरडू नायतर मेंढरू आणि दाखवायचा त्याला वडगांवचा रस्ता.. हायच काय त्यात येवढ? अँ?”
“ह्ये समदं खरं हाय! पर लोकं समदी शानी झाल्यात, पयल्यावानी कुठं शेरडं बाह्यर बांधत्यात!” रमज्यानं आपली शंका बोलून दाखवली.
“न का बांधनात. आपल्याला कुठं गावातलं शिरडू चोरायचं हाय? आणि हे बघा! ह्या वक्ताला एखाद्च शिरडू चोरून उपेगाच न्हाय. तर दोन-तीन-चार एका दमात घाव्तील तेवढी शेरडं नायतर मेंढरं चोरायची.” आसं नंद्यानं म्हणताच सर्वांचा एकच हंशा पिकला. “आरं ऽ ऽ बि-या धनगराचीच मेंढरं आज चोरायची!” म्हंजे चार-पाच महिने तरी बिनघोर कसं?”
“डोकं पर डोकं हाय हं नंद्याच!” असं म्हणुन उतम्यानं मन्याला एक ढुसणी मारली.
“पर आज आपल्याला मेंढर, कुठं रं घावायची?” या म्हाद्याच्या प्रश्न केंद्रावर, केरबानं बातमी दिली.
“तात्या शिंद्याच्या खोडव्यात बसिवल्याती.”
“बरं आज सांच्यापारी अनिक मारुतीच्या देवळात जमुच की !” रमज्या म्हणाला.
“कशाला? एकदम राच्यालाच गैबिधोलपशी जमुन समदीजणं भायर पडू!” नंद्या म्हणाला.
“बरं बरं!” असं म्हणून सर्वांनी नंद्याच्या मताला दुजोरा दिला. इतक्यात शाळेची मधल्या सुट्टीची घंटा झाली. सर्वांनी ठिय्या मोडला.
पायाखालची जमीन तापली होती. फोफाट्याचे चटके बसत होते. सर्वांच्या डोक्यावर टोप्या होत्या. त्यामुळे निदान डोकी तरी शाबूत होती. सर्वजण गाडीवाटेच्या कडेला उगवलेल्या गवतातून चालत येऊन सोनाराच्या घराफुडील सावलीला उभी राहिली.
सकाळी दुसऱ्याच्या बांधाला कामाला गेलेली माणसं दुपारची सुट्टी करून माळाच्या वाटेने गावाकडे परतत होती. कोणाच्या डोक्यावर वैरणीचा बिंडा, कोणाच्या हातात जेवणाचे मोकळे डबे तर कोणाच्या खांद्यावर कुदळ, बेडगी असे साहित्य दिसत होते.
वर्गातून मुलं बाहेर पडू लागताच नंद्याचा लवाजमा शाळेत शिरला आणि आप-आपली दप्तरं घेऊन त्या मुलांच्यात मिसळला.
संध्याकाळचे नऊ वाजले होते. हवेत थोडासा गारवा जाणवत होता. दिवसभर जास्त उकडल्यामुळे रात्री पाऊस येईल ही अशा होती. परंतु आकाशात असंख्य पांढ-या शुभ्र चांदण्या लुकलुकत होत्या. सर्वत्र रुपेरी पांढरे शुभ्र चांदणे पसरले होते. जमिनीवरील चंदेरी सडा नावोनाव खुलत होता. पौर्णिमेच्या रात्रीमुळे ‘चंद्रमा’ही झकास उगविला होता. ही मोहक दुधाळ रजनी जणु सौंदर्याची सम्राज्ञीच बनली होती. त्यामुळे प्रत्येकजण आप-आपली जेवणे आटपून, गार वा-यात बसायला घराबाहेर पडत होता.
रोकड्याचा मन्या, वांकराचा रमज्या, मोहित्याचा उतम्या,वाण्याचा केरबा आणि भोसल्याचा म्हाद्या सर्वजण रोजच्याप्रमाणेच, नंद्याच्या खोलीवर अभ्यासाला जातोय असं सांगुन घराबाहेर पडले.
कोणी मारुतीच्या देवळापाशी असलेल्या वडाच्या झाडाखालून, कुणी बंधा-याच्या शेडाला वळसा मारुन, कुणी चांदपिराच्या पलीकडून तर कुणी गावाबाहेरील रस्त्याने येऊन गैबिघोलावर दाखल झालं. तिथं थोडी चर्चा करुन सर्वजण मळीच्या वाटेला लागली.
गाडी वाटेने सर्वजण झपझप चालली होती. गाड्यांच्या चाकोरीत पाय पडल्याबरोबर फुफाट्याच्या चिपळ्या उडून बाजूला पडत होत्या. फुफाटा, पायांना थंडगार लागत होता. चालण्याला अधिक गती देऊन सर्वजण तात्या शिंद्याची मळी जवळ करत होते. भाऊ कांबळ्यांच्या रानातली करंजाडं ओलांडून सर्वजण पांदीनं वरच्या डगरीला लागली.
सगळ्यांच्या पुढं कदमाचा म्हाद्या होता. चालता चालता म्हाद्या एकदम थांबला. तसं नंद्यानं विचारलं,
“का रं? का थांबलास?”
“कोणतरी माणसं गावाकडं निघाल्यात!” असं म्हाद्या म्हणताच नंद्यानं, जरा पुढं जाऊन बघितलं तर खरंच समोरून कुणीतरी दोघजण गावाकडेच येत असलेली दिसली. तसा नंद्या म्हणाला,
“आरं केरबा, रमज्या, मन्या, उतम्या! अरं ऽ ऽ मागं फिरा! पांदीत दडून बसूया. न्हायतर ही माणसं आपल्यास्नी वळाकतीली आन् मग सगळाच बट्ट्याभोळ हुईल.
“होय होय! मागं फिरा रं!” म्हाद्यानं सूर ओढला.
सर्वजण डगरीनं पळतच खाली लवणात आली आणि पांदीत, शेंडाच्या आडाला मावळ्यांनी जसं खो-यात दबा धरून बसावं तशी, श्वास रोखून बसली.
ती दोन माणसं, तशीच डगरीनं खाली आली पांदी-पांदीनं गावाच्या वाटेला लागली. ती माणसं लांब गेल्याची नंद्यानं खात्री करुन घेतली आणि मग त्यानं सगळ्यांना बाहेर बोलावून घेतलं.
पुन्हा सर्वजण डगर चढायला लागले. डगर चढून वर जाताच लांबवर त्यांना कोणाच्यातरी शेतात जोंधळ्याची मळणी चालल्याली दिसू लागली. गाडी वाटेवरच मळणी मशीन आडवी लावलेली दिसत होती दोघेजण कणसाच्या पाट्या भरून बैलगाडीवरच्या मशीनवर उभ्या राहिलेल्या गड्याकडे देत होते. एकजण गावाकडेच्या बाजूला जोंधळ्याचे पोते लावून उभा होता. तर एकजण मशीनच्या पुढच्या बाजूला फावड्याने भूसकाट ओढत होता.
डोंगर कपारीत, उंचावरून पाणी खोलवर कोसळावे णी त्याचे तुषार आजू-बाजूला पसरावेत त्याप्रमाणे मशीनमधून भुसकाटाचा धुरळा उंच उडत जाऊन नंतर खाली पडत होता.
नंद्याला प्रश्न पडला. मळीच्या वाटेवरच मळणी चालली होती. मळणी मशीनपासुन जाणं धोक्याचं होतं!
वाण्याच्या केरबानं डोकं चालवलं. त्यानं नंद्याला, गाडीवाट सोडून पायवाटेन, चौगुल्याच्या पानमळ्याकडेने जायचं सुचवलं!
नंद्याला केरबाचं म्हणणं पटलं. सर्वजण गाडीवाट सोडून आडरानात शिरली. जाधवच्या रानातला शाळवाचा ताटवा ओलांडून सर्वजण तात्या शिंद्याच्या मळीत आली.
मेंढरं खोडव्यातच बसवली होती. त्यांच्या चौबाजूंनी कात्याच्या दोरींची दोन अडीच फुटाची जाळी लावली होती. एका बाजूला बि-या धनगर तर दुस-या बाजूला त्याचा पोरगं घोंगडं पांघरून गरख झोपलेला दिसत होता.
बि-या धनगराची दोन कुत्री होती. पण ती कुठच दिसत नव्हती. इथंच कुठतरी ती असणार! एखादे वेळेस ती कुत्री भुंकायला लागली तर बि-या धनगर जागा व्हायचा!! असा विचार करुन नंद्यान सर्वांना तिथंच थांबवलं. मन्या, म्हाद्या, रमज्या आणि उतम्याला येलगाराच्या मोग-यात दडून बसायला सांगितलं. आणि तो केरबाला दबक्या आवाजात हळूच म्हणाला,
“केरबा! म्या एकटाच फुढं जातो. त्वा हितच, नांगरटीत थाम. पद्द्शीर याक याक मेंढरू तुझ्याकडं काढून देतो. त्वा येलगाराच्या मोग-यात सरकीव मजी झालं!”
“येवस्तीत हं!!”
“काळजीच करू नगस!”
नंद्यानं आपला मोर्चा नांगरटीतून पुढं वळवला. वाकत-वाकत, बि-या धनगर जिथं झोपला होतं तिथं तो गेला आणि खाली बसला.
बि-या धनगराच्या पायथ्याला बसलेलं कुत्रं, चाहूल लागताचउठून उभं राहिलं. पुर्वानुभवानुसार खिशातून आणलेल्या भाकरीतील चतकोर तुकडा नंद्यानं त्या कुत्र्यासमोर फेकला.
जेवढीभाकरी कुत्र्यापुढं टाकली होती तेवढी त्यानं खाऊन टाकली. पण ते कळाखाऊ कुत्रं तिथून दुर जाईना. नंद्या तिथून उठला आणी खोपीकडं गेला. कुत्रंही त्याच्या मागोमाग खोपीकडे गेलं. पुन्हा नंद्यानं चतकोर तुकडा त्याच्यासमोर टाकला. तो ही त्यानं खाल्ला. पण त्याच्या जवळनं जायला ते ढमय म्हणेना! शेवटी नंद्यानं त्याच्याजवळ राहिलेली सगळीच भाकरी त्याच्या समोर टाकली. तीही त्यानं खाऊन फस्त केली. पण आता मात्र ते नंद्याला सोडून इकडं-तिकडं करू लागलं. नाकानं काहीतरी ते हुंगल्यासारखं करू लागलं. नंद्याला आशेचा किरण दिसू लागला. पण पुन्हा ते काहीतरी हुंगत-हुंगत नंद्याजवळ आलं आणि सवयीप्रमाणं त्यानं एक तंगडं वर करुन नंद्यावर फवारा मारला. नंद्याचे दोन्ही हात एकदम जोडले गेले आणि तोंडातून शब्द उमटले,
“धन्य झालो हं खंडोबाराया! उपकार केलेत आमच्यावर!”
पायानं जमीन उकरल्यासारखीं करुन दिडक्या चालीनं ते कुत्रं शिवारात पशार झालं.
“काय सॉट कुत्रं हाय ह्ये! चावाट, लापाट, झाँड!!” पटापटा समानार्थी उपमा नंद्याला सुचून गेल्या.
“च्या आयला! आकबंद भाकरी खाल्ली आणि वर....” पुन्हा नंद्यानं हात जोडले, “उपकार केलात निदान इथनं लांब तरी गेलात!”
नंद्या पुन्हा बि-या धनगरच्या अंथरुणाजवळ आला. तसं बाजूच्या चगाळात झोपलेलं दुसरं कुत्रं चाहूल लागताच खडबडून उठलं. आता नंद्याजवळ त्याच्यासाठी भाकरी नव्हती. नंद्या खाली बसला. कुत्रं त्याच्याजवळ आलं. बराच वेळ निघुन गेला पण काही केल्या ते कुत्रं काही त्याच्यापासून हलेना.
“काय याक, याक जितराबं बि-यानंबी पाळलेती!” नंद्या तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
नंद्यानं डोकं चालविलं. बि-या धनगराच्याच अंथरुणावरती त्याच्या शेजारीच तो आडवा झाला आणि झोपल्याचं सोंग घेतलं. त्यानं सहज, उशाच्या बाजूला हात फिरवला. त्याच्या हाताला बि-या धनगराचा पान खायचा बटवा लागला. नंद्याला वाटलं बटव्यात एखादं सुपारीचं खांड तरी खायला घावल. या हिशेबावर त्यानं बटव्यात हात घातला. ‘अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ असच नंद्याला क्षणभर वाटलं. त्या बटव्यात त्याला शंबर रुपये सापडले. आता या पैशावर चार-पाच फिष्टी तर सहज होणार होत्या. पण नंद्यानं विचार केला, ‘नको! हे पैसे घ्यायला नको. कारण बि-या खूप गरीब आहे. निव्वळ उसन्या-पासन्यावरच त्याची रोजी-रोटी चालते हे समद्या गावाला माहित आहे. लहानपणीच त्याचे आई-वडील वारलेले. गावक-यांनीच त्याचा सांभाळ केलेला. हेही नंद्या ऐकून होता. पुढे गावक-यांनीच त्याचे लग्न लावून दिले. पण बिच्या-याचं दुर्दैवं! पहिल्या बाळंतपणातच त्याची बायको वारलेली. त्याच्या मुलाचं, बाळीशाच संगोपन त्यानच केलं होतं. दुखणी-पाखणी रिन काढूनच सहन करत होता. नुकतीच त्यानं किसन्या धनगराची तीसेक मेंढरं अर्धलीनं सांभाळायला घेतली होती. आयुष्यात आपल्याला सुख लाभलं नाही, निदान आपल्या पोराला तरी सुख लाभावं, म्हणुन तो खपत होता. राबत होता. हसा-खेळायच्या वयातील आपल्या पोराला तो त्यापाई वणवण हिंडवत होता. पैला-पै जमवुन हेच शंभर रुपये जमवायला किती कालावधी लागलं असेल याला? मग आपून हे शंभर रुपये घ्यायचे का? छे! नको रे बाबा! आपून यातले फकस्त पन्नासच रुपय घेऊ!’
असं विचार करुन त्याने त्यातले पन्नासच रुपये घेतले. बाकीचे पन्नास तसेच ठेऊन दिले.
नंद्यानं इकडं-तिकडं ते कुत्रं कुठं दिसतयं का ते पाहिलं. ते कुठंच दिसेना. ते कुठंतरी शिवारात लांबवर गुल झालं असावं असा विचार करून नंद्या तिथुन उठला. पैसे खिशात ठेऊन तो मेंढराच्या कळपाजवळ आला. कडेच्याच एका मेंढराला नंद्या गोंजरायला लागला. तो गोंजरायला लागल्यामुळं ते मेंढरूही गपगार उभं राहिलं. तसं गोंजरत, गोंजरत त्याने त्याचे चारी पाय हळूच घट्ट धरले. त्या मेंढराला त्याने तसेच हळूच उचलले आणि तसाच तो पळत नांगरटीत शिरला. केरबा वाटच पहात होता. नंद्या केरबाच्या हातात ते मेंढरू देऊन तसाच आल्या पावली परत फिरला.
केरबा ते मेंढरू घेऊन येलगाराच्या मोग-यात शिरला. तोपर्यंत नंद्यानं दुसरं मेंढरूही तसच पकडलं आणि तो नांगरटीतुन बाहेर यायला लागला. पण, चागाळात झोपलेलं कुत्रं शिवारात गायब झालेलं नव्हतच! ते चागाळातच झोपलं होतं. एकाएकीच ते उठून भुंकायला लागलं.
बि-या जागा झाला. कुत्रं का भुंकायला लागलय म्हणून तो अंथरुणावरती उठून बसला. त्याच लक्ष नंद्याकडे गेलं. चंद्राच्या पंध-या शुभ्र प्रकाशात, आपलं मेंढरू कोणतरी पळवून घेऊन चाललय हे त्याला जाणवलं. शेजारची कु-हाड हातात घेतली नि तो मोठ्याने ओरडला,
“आरं ऽ ऽ को ऽ ऽ ऽ ण ऽ ऽ हा य त्यो ऽऽऽऽ?”
दुस-याच क्षणी तो त्याच्या पाठीमागे लागला. बि-यानं येलगाराचा ताटवा ओलांडेपर्यंत, त्या सर्वांनी चौगुल्याचा पानमळा गाठला. बि-याला पोरांची आख्खी चौकडीच दिसली.
एक मेंढरू नंद्याजवळ होतं तर दुसरं केरबाजवळ होतं! सर्वजण डगर संपवून पांदीनं पळत गावाच्या वाटेला लागली. त्यांच्या पाठोपाठच बि-या धनगरही चौगुल्याचा पानमळा ओलांडून डगरीनं पांदीच्या वाटेला लागला.
कदमाच्या म्हाद्यानं मागे वळून बघितलं. बि-या धनगर पाठोपाठच येत होता. बि-यानं पांदीलाच त्यांना गाठलं होतं. म्हाद्या नंद्याला म्हणाला,
“आता काय खरं न्हाय! गावापातुरबी ह्यो बाबा काय आपल्यास्नी जाऊ देणार न्हाय!” त्यावर नंद्या उतम्याला म्हणाला,
“उतम्या! म्हाद्या, मन्या, रमज्या आन् केरबाला जावदे! आपुन बि-याला हितच आडवू!!”
“आर्, पर त्येच्या हातात काय हाय त्ये बघितलस का? कु-हाड दिसतीया! आन तीबी फरशी!”
“मग काय करायचं?”
“हान धोंडा!!!” असं उतम्यानं सांगताच रस्त्याकडेचा एक धोंडा नंद्यानं उचलला आणि मागं सरकून, जुमानुनच बि-या धनगराला मरला. त्या धोंड्याच्या झटक्यासरशी बि-या आडवाच झाला.
बि-या धनगराच्या छातीवर धोंड्याचा दणका बसला होतं. बि-या धनगर घायाळ झाला. हंबरडा फोडून ओरडू लागला. त्या धोंड्याच्या दणक्यानं त्याच्या पोटातली आतडीच गोळा झाली होती. छातीतून असंख्य वेदना येत होत्या. रक्ताच्या उलट्या तो करू लागला.जणू आपलं काळीज फुटल्याचाच त्याला भास होत होता. तो आपल्या न्हानग्या लेकराला हक मारू लागला.
“बाळीशा ऽ ऽ ऽ ऽ! आरं ऽ ऽ बाळीशा! लवकर ये रं ऽ ऽ ऽ!” त्याचा आवाज क्षीण बनत चालला होता.
“बाळीशा ऽ ऽ ! माझ्या लेकरा ऽ ऽ ! ई की ऽ ऽ रं! मा ऽ ऽ ! आँ हा ऽ ऽ ! मा ऽ ऽ माझ्या छातीवर धोंडा बसलाया१ म्या आता काय ह्यातन जग ऽ ऽ त न्हाय ऽ ऽ ऽ ऽ! आरं ईकी रं लेकरा!”
नंद्याच्या कानावरती बि-याचा हंबरडा पडत होतं. नंद्याला गलबलून आलं ‘काय झालं ह्ये आपल्या हातनं! नंद्याला बि-याचा आक्रोश ऐकवत नव्हता. त्याच काळीज तिळतिळ तुटू लागलं. काय करावं त्येच त्याला सुचना! नंद्या आणि उतम्या रोवलेल्या खुंट्यासारखी तिथच भ्रमिष्टासारखी उभी होती.
“पाणी ऽ ऽ पा ऽ ऽ णी, पाणी, पाणी, पाणी! बि-या पाणी मागू लागला. आता मात्र नंद्याला रहावेना. चैन पडेना!
नंद्या आणि उतम्या बि-याजवळ आले. त्यांनी पाहिलं बि-यानं रक्ताच्या उलट्याच उलट्या केल्या होत्या. तो जायबंद झालं होता. फुफुट्यात हात घासत होतं टाचा खुडत होतं. मध्येच गप्प होऊन पुन्हा पाणी मागत होता.
“बाळीशा पाणी दि की! रं! हिकडं म्या ऽ ऽ म ऽ ऽ मरा ऽ ऽ यला लागलू ऽ ऽ या! आन त्वा तिक ऽ ऽ डं का ऽ ऽ य कर ऽ ऽ तुया ऽ ऽ स!”
बि-या गहिवरत होता. पाणी मागत होता. आपल्या लेकराला तो बोलवत होता. पण त्याच्या लेकराला तरी काय माहीत असणार? आपला बाप कुठल्या अवस्थेत सापडलाय ते. दिवसभर मेंढरं हिंडवून-हिंडवून बिचारं त्येबी थकुन गेलं होतं! त्यामुळं त्याला गरग झोप लागली होती.
नंद्याला वाईट वाटू लागलं. नंद्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याचं डोकं मनस्तापानं पोखरलं होतं!
‘काय बिच्या-यानं वाकडं केलं होतं? का आपण त्याला ही सजा दिली आसलं? फक्त फिष्टीसाठी? जिवाच्या चैनीसाठी? ह्यातनं जर बि-या मेलाच तर? बाळीशा अनाथ होणार? त्याच्या आयुष्यभराच्या दुःखाला आपुनच कारणी ठरणार!’
बि-याचा आवाज खोल खोल होत चालला होता. तो पाणी-पाणी करत होता. पाणी मागत होतं नंद्या जवळ असूनही भुलल्यागत झाला होता. त्याला कुठूनतरी पाणी आणून बि-याच्या मुखात पाण्याचे चार थेंबही घालायचे सुचत नव्हते!
‘पाणी-पाणी’ करत बि-या शेवटी निपचिप पडला. ते पाहून नंद्या भानावर आला. त्याने आपले डोके दोन्ही हातांनी गच्च दाबुन धरले.
‘आपण शेवटच्या क्षणीही बि-याला पाणी पाजू शकलो नाही’. या विचाराने त्याला पुन्हा मनस्तापात फेकलं.
शेजारच्या उतम्यानं नंद्याला सावध केलं. आणि मग ती दोघही रमाट्यानच पळत गावाकडे आली.
नंद्याच्या खोलीसमोरच मन्या, कर्ब आणि रमज्या उभी होती. उतम्या आणि नंद्या सुखरूप परत आलेली पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला.
नंद्या अजुनही विचारांच्याच तंद्रीत होता. कुलूप काढून झटकन खोलीत शिरावं, हे त्याच्या डोक्यातच शिरत नव्हतं! त्याच्या डोक्याचा भुस्सा झाला होता. नजरेसमोर टाचा खुडत ‘पाणी पाणी’ करणारा बि-या त्याला दिसतं होता! ‘आजपास्न ‘फिष्ट’ बंद! आयुष्यात वाईट एवढं काय करायचं न्हाय!’ असा विचार त्याच्या मनात घोळत होता.
नंद्याची ती अवस्था पाहून उतम्या खवळला. दबक्या आवजातच तो नंद्यावर खेकसला,
“लेका काढ लवकर कुलुप आणि उघड की खुली!”
नंद्या भानावर आला. त्यानं किल्लीसाठी खिशात हात घातला आणि एकदम चपापला. पुन्हा चाचपून किल्ली त्यानं बघितली. पण किल्ली काही त्याला सापडेना! केरबानं विचारलं,
“काय झालं रं?”
“घात झालं लेका! किल्ली बि-या धनगराच्या हातरुनावर पडली!”
“पडली तर पडू दे. चल आमच्या छपरात मेंढरं बांधू!” असं उतम्यानं म्हणताच नंद्या म्हणाला,
“आपून समदी फसलो लेकांनो!!”
“त्ये कसं काय रं?” रमज्यानं विचारलं. आरं, किल्ली बि-या धनगराच्या हातरुनावर पडली त्याचं काही न्हाय रं! प्र त्या किल्लीवर माझं नाव हाय रं!!!”
हे ऐकल्यावर सर्वांनीच कपाळावरती हात मारला.
******************************************
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाची आहे. वरील कथेवर आपण जरूर प्रतिक्रिया द्या.आपली प्रतिक्रिया हेच लेखकासाठी प्रोत्साहन व साहित्यिक बळ आहे.

5 comments:

  1. Hi, Mala hi katha khup khup khup avdli. tumhi khup sundar ritine sagle madle aahe.....asech lihit raha...amhala vachyala far avdel.....thanks a lot..& keep it up........ALL THE BEST.........

    ReplyDelete