Sunday, 25 April 2010
धडपड
लेखक-विजय तानाजी शिंदे
एम्. एच्. ओ. बारा छत्तीसनं मंगळवेढा सोडला आणि रस्त्यावर वेग पकडत धावू लागला. ट्रकच्या पाठीमागं हौदात ज्वारीची पुती भरली हुती. लोडाचा माल. ट्रक दम खावून दम खावून चढ चढायचा. डायवर गिअरचं दांडकं धरून पटाटा गिअर बदलायचा. ट्रक गचकं खात खात दढ पार करायचा.
उन्हाळ्याचं दिस. गरम हवेचे झोत दरवाजातनं आत घुसायचे. आदिच इंजनामुळं केबिनमधली हवा गरम झाल्याली. त्यात गर्दी, तीन बाया, दोन गडी किन्नर आणि डायवर. अशी सात माणसं दाटीवाटीनं बसल्याली. किन्नरची कापडं तेलानं काळीमिट्ट झाल्याली. लुकड्या गडी चार महीनं झालं ट्रक बदलून या ट्रकाबरोबर आलेला. लय आडचण व्हाया लागली म्हणुन त्येनं दुनी पाय भाहीर काढलं. त्वांड बी भाहीर काढलं. हवेचा झोत आला. घामानं भिजलेल्या अंगावरनं गेला, तसं गार वाटलं. हवेचं आसं झोत अंगावर घ्याला बरं वाटायचं. डायवरला लय उकडाय लागलं. गाडीतल्या बायकाकडं आदनं-मदनं बघायचा. बायका डोळ्यात डोळं घालून हसायच्या. तसा डायवर गाडीचा वेग वाढवायचा.
दोन दिस झालं, आंघुळीचा पत्ता नव्हता. अंगावरचा घाम वाळत हुता. काळं कुळकुळीत आंग, दात पांढर शिपट, दाढी वाईसी वाईसी वाढल्येली. जागून जागून लाल झाल्यालं डोळं. नाक, गाल, कपाळावर तेलकाट जमल्यालं. इकडं-तिकडं बघत टिरिंगचं चाक फिरवत हुता. पाय सारखं वर-खाली करुन क्लच, ब्रेक अँक्सिलरेटरची दांडकी दाबत होता. सराईत हातानं गिअर बदलत हुतं.
डायवरच्या पाठीमागं दोन माणसं. एक धोतार, बंडी घालून बसलेला. दुसरा मळकटलेल्या पँट शर्टात हुता. त्येनला लागुनच तीन बाया. सावळ्या रंगाच्या तीस-पस्तीशितल्या. इकीचं आंग रेखीव आणि दणकट. डायवरच्या सराईत हाताकडं बघत हुती. डायवरची नजर घुटमळत तिच्याकडं जायाची तशी ती बी सरावलेल्या नजरनं त्याच्याकडं बघायची.डायवरला बी गुदगुल्या व्हायच्या. मनात म्हणायचा, ‘आयला बरं झालं, मिरजंपातुर इरंगुळा झाला. टेप सुरु केला. इरसाल लावणी – ‘पाडाला पिकलाय आंबा’, लावणीचा इशारा डायवरनं केला. तिला बी कळला.
गाडीत बसल्याली बाया-माणसं एकमेकांच्या वळकीची हुती. मिरजला जायाचं हुतं. दोन-तीन बारकी गटूडी पायात ठिवली हुती. गड्यांच्या हातात पटकाराच्या पिशव्या हुत्या. मांडीवर घिवून बसल्याली. लावणीचा आनंद घेत ट्रक बरोबर सगळी रानं तोडत
हुता. झाडं मागं पळत हुती. पुढनं आल्याल्या गाड्या ‘घ्वांय ऽ ऽ ऽ’ करत मागं जात हुत्या. मागनं येणा-या जीपा, टॅक्स्या, मोकळं ट्रक, यसट्या, टॅम्पो, बारक्या गाड्या ........ ट्रकला वलंडून म्होरं सरकत हुत्या. टायरांचा ‘चारं ऽ ऽ ऽ रं, चाट ....... चाट’ आवाज याचा. आंतर तुडून लांब जात बंद व्हायचा. म्होरं गेल्यालं वाहन बी कुठंतरी गुडूप व्हायचं.
बारकी-चिरकी गावं मागं पडत हुती. रस्त्याच्या कडच्या पाट्या दिशा दाखवत हुत्या. सावधान करत हुत्या. उजवीकडं वळण असल्याली पाटी दिसली. डायवरनं सराईत हातानं टिरिंग वळवलं आणि वेग वाढवला. रस्त्याकडच्या नंबरवर लायटीचा उजीड पडला. सांगोला एक किलोमीटर वर असल्याची सूचना दिली. ‘खाडा ऽ ऽ ऽ .....डं’ ट्रक थरथरला. पावसानं भिजलेल्या शेळीसारखं आंग झाडलं. आणि स्पीड बेकर पार केला. नव्या उमेदीन सांगोल्यात घुसला. ट्रकचा वेग थोडा कमी झाला. डायवर पुढच्या परवासाचं येळापत्रक ठरवू लागला. जेवाण कुठं करायचं? च्या कुठं प्याचा? आता किती वाजल्यात? आपण किती वाजंपातूर पोहचू? .......... डोक्यात इच्यार, चकराच्या येडया बरोबर येडं काढायं लागलं.
वाहनांची वरदळ वाढाय लागली. सांगोल्यात थांबा जवळ येत हुता. डायवरला वाटलं आजुन दोन-तीन माणसं घिवून बोकड कमाईत भर टाकावी. रातरीचं जेवण तरी भाहीर पडंल. या इच्यारात किन्नरला हाक मारली.
“बारक्या”
“काय वस्ताद”
“आरं, जेवण कुठं करायचं?”
“तुमी म्हंचाल तिथं, म्या काय सांगू?”
“भडव्या, तुला काय सुचत न्हाय का?” डायवरनं बारक्याला पदवी बहाल केली. त्यो पुढं म्हणाला, “किती वाजल्यात बघ बरं?”
बारक्यानं डायवरच्या हाताकडं बघितलं आणि म्हणाला,”घड्याळ कुठं ठिवलसा?”
“डावरमधी टाकलंय.”
बारक्या ट्रकात बसलेल्या माणसाकडं बघुन म्हणाला,”पावनं टायम काय झालाय?”
पावण्यानं मानकुट हालवलं. “साहेब घड्याळ न्हाय वं.”
“बरं-बरं आसू द्या.” डायवर म्हणाला. त्याला बायकांची थुडी गंमत करावी वाटली. त्येच्याकडं बघत म्हणाला,”तुमच्याकडं न्हाय वी घड्याळ?”
एकजण म्हणाली, “न्हाय. गरीबाची थट्टा करताय व्हय. आमच्याकडं कुठलं आसतया वं. रोजगार करुन, भीक मागुन आमी खाणार. तुमच्याकडचं बघुन सांगा की.”
पाठीमागचा माणुस पुढं सरकत म्हणाला, “व्हय-व्हय सांगा की, आमी मिरजत कवा पोचतुया ते बी कळू द्या.”
बारक्यानं चावी लावली. डावर उघडला. पैशाच्या नोटावरचं घड्याळ उचललं आणि म्हणाला, “आठ वाजल्यात वस्ताद.”
“साडेनव वाजता शिरढोण मधी पुचू का?” वस्तादनं प्रश्न केला.
“व्हय.”
“मग आपण तिथंच जेवाण करू या.” जेवणाचा टाईम वस्तादनं ठरविला. पुन्हा म्हणाला, “इथं च्या प्यायचा का?”
“व्हय व्हय पिवया की.” बारक्या खुश झाला. घड्याळ डावरमधी टाकलं. पैशावर नागासारखं इटूळ मारुन घड्याळ बसलं.
पाठीमागचा माणुस पुढं सरकत म्हणाला, “किती वाजल्यात म्हणालासा?”
“आठ वाजल्यात.” बारक्यानं उत्तर दिलं.
“मग आमी मिरजत कवा पोहचू?”
“बारा-एक वाजत्याल बघा.” डायवर म्हणाला.
“वाईच ट्रक पळवा की.”
“का तांदळाला जायाचं हाय काय?” डायवर खेकसला. तसा तो माणुस माग सरकला आणि बारीक आवाज करीत म्हणाला, “जरा गडबड हुती वं.”
डायवर जरा सबुरीन घेत म्हणाला, “न्हाय वं मागं माल गच्च भरलाय. आन रस्ता तर बघा की किती खाचखळग्याचा हाय.”
“ते बी खरचं हाय म्हणा.” एक माणुस म्हणाला. दुस-या माणसानं खळग्यांना सम्मती देत मान हालवली. “आसु द्या, आसु द्या सावकाश जावू दी.”
दोघं बी माग टेकली. आपापसात काय-बाय बडबडली. वस्तादला एवढंच कळलं की, ही पारध्याची भाषा हाय. गाडीत चार-पाच हजार रुपये हुतं. त्याला जरा काळजीचं वाटली. मनात म्हणाला, “आयला पारध्याची जात लय वाईट, मार दिवून माल घिवून जायाची.” इच्चार केला. ‘म्या बी काय कमी न्हाय. एका एकाच्या उरावर बसीन. न्हाय तर ह्येंच्यात जीव कुठं हाय. माझं आंग नुसतं रेड्यासारखं हाय. एका एकाच्या नरडीचा घोटच घिन.... पर बायाचं काय करायचं?.... बोंबलाय लागल्या आणि आसपासची माणसं गोळा झाली तर?’
वस्तादनं मागं वळून बघितलं. बायनं काच्चदिशी डोळा घातला. तो गडबडलाच. मनातलं भ्या रस्त्यावर पडलं आणि त्येच्यावरनं ट्रक गेला. भ्या रस्त्यावर चिटकून राहिलं आणि वस्ताद बायकांचा विचार कराय लागलं......
वस्तादला गप्प बसवना. त्यानं इचारलं, “मिरजला कशाला चाललाय?”
“आमचा तिथं यक तळ हाय. तिकडं चाललूय.” एकीनं उत्तर दिलं.
वस्तादनं पत्त्याच्या पानासारखा दुसरा प्रश्न तिच्या पुढयात टाकला, “काय काम हाय वो.........?”
“व्हय.”
“कंच म्हणायचं?”
“पावण्याची म्हातारी मिलीया.” एका माणसानं सांगितलं.
“आरा ऽ ऽ ऽ रां वाईट झालं.” वस्तादला वाईट वाटलं.
“कशाचं वाईट. पिकल्यालं पान गळणारच की वो.”
“आवं पर तुम्हाला किती पळाय लागतंय बघा की.” वस्ताद म्हणलं.
“मग काय करायचं? नाती जोडल्यात न्हवं. ही माझी बायकु.” ट्रक चालू झाल्यापासनं गप्प बसल्याल्या बाईकडं हात करत तो माणुस पुढं म्हणाला, “तिची आयच मिलीया. मजी माझी सासू. मग जायायचं पायजी वो.”
“तर तर गेलंच पायजी. जिच्या पोटातनं आपण जग बघाय आलू, जिन आपल्याला डोळं दिलं, त्या डोळ्यानं तिला बघितलाच पायजी वं.” वस्ताद म्हणालं.
“काय बघितलं पायजी आन काय न्हाय. गांव - न् - गांव पालथा घालून जीव आंबून गेलाय बघा. खायला आनं मिळत न्हाय का प्याला पाणी. सारखं आन्नाच्या पाठीमागं पळावं लागतयं बघा. धडपड करावी लागत्या. पायपीठ करावी लागत्या. धडपडून जीव कासावीस हुतुया. तरीबी प्वाट भरत न्हाय.” त्या माणसानं आपल्या जीवनाचं पान वस्तादपाशी उघडलं.
“खरंच पण ही दिस काय आसच रहात्यात का? बदलत्यात की.”
“कसं बदलायचं न काय”
“का वं ?” वस्तादन पुन्हा प्रश्न केला.
“देव काय आम्हांला आभाळातनं पैसं पाठीवनाराय?”
“पर तुमी चार पैसं गाठीला बांधून एका जाग्याला का रहात न्हाय?” वस्तादनं प्रतिप्रश्न केला.
फाटल्याली कापडं दाखवत तो माणुस म्हणाला, “गाठ मारायला कापडं तर धड पायजीती की, ही बघा सगळं भसकं हायतं कुठनं पैसं याचं आणि कुठं ठेवायचं.” त्येनं गारहाणं चालूच ठेवलं.
वस्ताद ईचार कराय लागला. “आयला खरंच या माणसांच कसं व्हायचं....आणि म्या बी हाय, गरिबांच्या बायावर डोळा ठीवतुया. चुकलं माझं देवा. पण ती बी किती आगाव हाय. डोळा घालत्या. जरा तरी भान असावं की, आपण कशासाठी चाल्लूया, कुठं चाल्लूया....आमचं काय रोजचं रडगाणं...आज हिथं उदया तिथं...जगायसाठी.पोटापाण्यासाठी नुसती धडपड..... घरापास्ना बायकापासनं, पोरापासनं महीनं- महीनं भाहीर रहावं लागतं. मग मनाला बरं वाटायसाठी वायसं धडपडून बाघायचं....
सांगोला आलं. टीरींग गरा गरा फिरवून वस्तादनं गाडी बाजूला लावली.फुडनं वाहनं येत हुती. थांबत हुती. जात हुती. त्यानं माग-फुडं बघितलं. गाडी नीट लागल्याची खात्री केली आणि उतरून किन्नर साईडला आला.
“म्या अगुदर च्या पिऊन इतु.मग तु जा.” वस्ताद बारक्याला म्हणाला.
“बर बर”
“पावनं तुमास्नी बी च्या पाणी करायचं आसलं तर करा.दहा मिनटं गाडी थांबणार हाय.” असं म्हणत वस्ताद हाटेलकडं वळलं.
पारध्याची माणसं उतरली.च्या पाणी करून लगीच माघारी आली.त्येंच्या बरोबर दोन बाया आणि एक माणुस नवीनच आला. किन्नरला म्हणाली, “हेन्ला बी मिरजला याचं हाय.”
“आवं पर जागा न्हाय. राच्ची येळ हाय. झ्वाप येणार. अवगाडून कुठंपातुर बसायचं?” बारक्या म्हणाला.
“वायसी जागा करा की! लय अडचण हाय बघा. येळत पोचलं तर म्हातारीचं त्वांड बघाय मिळल.” काकुळतीला येत एकजण म्हणाला.
“बरं बरं, थांबा.वस्ताद इवूद्यात.”
वस्ताद च्या पिऊन, पानानं त्वांड रंगवून आलं.कराकरा पान चावत म्हणालं,”बारक्या, जा च्या पिऊन ये रं बिल दिऊन आलुया. पाच रुपये घे.तुला काय घ्याचं असलं तर घी.”
बारक्या खुश झाला.त्यो पाच रुपये घेत म्हणला, “ वस्ताद ह्येंची आणखी तीन माणसं आल्याती.त्येन्लाबी मिरजला जायचं हाय.”
वस्ताद त्यांच्याकडं वळून म्हणालं, “ दुसरया टरकातनं ईवू दया की. बसायला अडचण हुत्या.”
“बघा की सायब. राच्ची येळ हाय डायवर घेत न्ह्यायती.येळत पोचाय पायजी. माणसं पाखरावाणी वाट बघत असत्याली. वायसं सरकून बसतु की.” पारध्यांनी गयावया केली.
“आवं पर.....”
“न्ह्याय... न्ह्याय आसं म्हणू नगासा.”
“व्हय व्हय, बसतु की”
“मग इवू दयात” वास्तादनं परवानगी दिली.
बारक्या च्या पिवून आला. गुटक्याची एक पुडी वस्तादकडं ढकलली.
वस्ताद म्हणलं,”आरं वा, लयचं हुशार हायसं की.”
बारक्याला बरं वाटलं, वर चढला. टपावर गडी माणसं बसल्याली. केबिनमधी पाच बायकाच. बारक्याला बी नीट जागा मिळाली. वस्तादनं स्टार्टर दाबला. ‘घुर्र ऽ ऽ ऽ’ इंजनानं आवाज दिलं. तवर एक माणुस पळत येत म्हणाला, “मिरजला जायाचं हाय.”
वस्तादला वाटलं आजून पंधरा-वीस रुपये मिळतील. गिअरच्या दांडक्यावर हात ठेवत म्हणालं,”वर बसणार का?”
“म्या एकटाच?”
“न्हाय. आजून दोन-तीन हायती की.” बारक्या म्हणाला.
“मग बसतु की.” गाडयांची वाट बघत बसलेल्या त्या माणसानं लगीच कबुल केलं.
“मग या.”
वस्तादनं गिअरच्या दांडक्यावरचा हात काढला. टिरींग मोकळं सोडलं. ब्रेक दाबून धरला. नवा माणूस वर चढला. टपावर आपली पिशवी सांभाळत बसला. वस्तादनं ब्रेकवरचा पाय काढला. क्लच दाबून गिअरचं दांडकं वडलं. क्लच हळूहळू सोडलं. गाडी पुढं सरकू लागली. वेग धरू लागली.
स्पीड ब्रेकर आला. रेल्वेचं फाटक पार केलं.शिटी फुकत पोलीस आडवा झाला. त्येला बघून वस्तादनं शिवी हासडली. “हेच्या मायला.... डोमकावळा आला वाटतं.”
“का रं माणसं बसवतुस का काय?”
“न्हाय सायब.”
“न्हाय काय आत कोण हाय? आयला नुसत्या गवळणीच बसवल्यात्या....चल उतर खाली.”
वस्तादनं उगच पिच-पिच नको म्हणून दहा दहाच्या तीन नोटा टेकवल्या.
पोलीस नोटांकडं बघत म्हणाला, “ आं....नुसतं तीसच? आमी काय देव हाय हुई निवद दाखवायला?”
“न्हाय सायब....आज धंदाच झाला न्हाय.”
“सगळी आसं म्हणाय लागल्यावर आमच्या पोटापाण्याचं काय व्हायचं?”
पोलिसानं पोटावरनं हात फिरवला आणि पिण्यासाठी बाटलीचा इशारा केला.
वस्तादनं आणखी एक दहाची नोट त्याच्या हातावर टेकवली. तसा तो म्हणाला, “........आता कसं! जावू दी.”
वस्ताद पान थुंकला. पोलीसानं चाळीस रुपयाला थुका लावला. त्यानं बी एक लांब-लचक शिवी दिवून ट्रक पुढं काढला.
सुत गिरण, सांगोला एम्. आय्. डी. सी., कमळापूर आणि बारकी-चिरकी गावं, वस्त्या मागं टाकत वस्ताद ट्रक रेमटू लागला.
नव वाजत आल्या. जुनोनी पार केलं आणि ट्रक गांव सोडून रस्त्याला लागला. वाकडी – तिकडी वळणं घेवु लागला. पुढनं येणारी वाहनं लायटी कमी-जास्त करायची. कसलं तरी इशारं व्हायचं. वस्ताद कवा तरी हात भाहीर काढायचा, कवा तरी शिवी द्यायचा.
पुढनं टॅक्सी वेगानं याय लागली. लायटीचा मोठा लाट झोत तोंडावर पडला. सगळं उजळून निघाल्यासारखं झालं. डोळ्यापुढं अंधारी आली. वस्तादला राग आला.वस्तादनं ट्रकचं कट हानला. ट्रक टॅक्सीच्या अंगावर धावून गेल्यासारखा गेला. पुन्हा कट मारुन रस्त्यावर नीट आला. हिंदकोळं बसलं. डुलक्या घ्याय लागल्याल्या बाया जाग्या झाल्या. टॅक्सी डांबरी सोडून खाली गेली.वस्तादनं ट्रकचा वेग कमी केला.त्वांड बाहीर काढून टॅक्सीवाल्याला शिवी दिली. गिअर बदलून वेग धरला.
बायका कावरया बावऱ्या झाल्या. एक म्हणाली, “ आवं हळू चालवा की.”
“काय हळू चालवा. सावकासच चालवतुया की, सालं लायटचं बंद करत न्हायत. आसं केल्याबिगर त्येंची जिरत न्ह्याय....” वस्ताद बडबडाय लागलं.
वस्ताद वैतागला हुता. एवढ्यात टपावर धडपड झाली. टप आपटल्यासारखा, बडवल्यासारखा आवाज झाला. “बारक्या वर बघ रं काय कालवा चाललाय....का कुस्त्या कराय लागल्यात?”
बारक्या दरवाज्याच्या बारला धरून उभा राहीला. वर सगळा अंधारच. काय दिसत नव्हत. अंदाजानच तो म्हणाला, “पावनं काय चाललंय? गप्प बसा की.”
“ व्हय व्हय तेच करतुय. झोपायची तयारी कराय लागलुय. तुमच्या वाकडया तिकड्या चालीवण्यात पडलू न्हवं.”
“बरं, झोपा नीट.”
“हां... व्हय व्हय”
बारक्यानं आंग आकाडलं आणि आत बसला.शिरढोण अजून वीसेक किलोमीटर हुतं.नव वाजून गेल्यालं.पोटात कावळं वरडाय लागल्यालं. कवा जेवाय बसीन झालं हुतं.बारक्याला घराकडची आठवण झाली.घरात असतु तर इदुळा जेवाण झालं असतं. हातरुनावर कलंडून असतु.घराकडची आठवण झाली तसं बारक्यानं आणखी बारीक त्वांड केलं. वस्तादला त्येची दया आली आणि म्हणालं,
“कारं बारक्या काय झालं?”
“कुठं काय...काय न्ह्याय.”
“एवडं बारीक त्वांड कशापाय केलंयस. घराकडची आठवण इत्या?”
“व्हय...न्ह्याय-.न्ह्याय.”
“व्हय...न्ह्याय-.न्ह्याय काय? येत आसली तर सांग की?”
बारक्याला लय वाटलं वस्तादला सांगावं आय ढोरामागं पळून-पळून दमत्या. बा दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी करतुय. धाकली भण लग्नाला आल्या. लगीन कराय पायजी. गावातली टवाळकी पोरं डोळा ठीऊन अस्त्यात. जीतलं माणुस तिथं गेलं म्हंजी कसं. चार पैसं मिळवाय भाहीर पडलू.धडपडाय लागलू. निस्ता धडपडतूया.... हातात काय बी घावात न्हाय. वस्तादचीबी लय रडगाणी.तिथं आपलं आणि कशाला गा... आणि आपलं रडगाणं त्येंच्या फुडं गाऊन काय उपिग हाय का? बारक्या गप्प बसला.
वस्तादला रहावलं न्हाय. त्येला बारक्याकडं बघून धाकट्या भावाची आठवण झाली. बारक्या बी तसाच. त्यांनी त्याला मायेनं विचारलं, “भुका लागल्यात हुई रं?”
“व्हय.”
“थांब अर्ध्या तासात शिरढोणला पुचू. वळकीचा धाबा हाय.पैसं बी कमी पडत्यात अन जेवाण फसक्लास असतंय.आज मटण खाऊ या का?”
बारक्याला बरं वाटलं पण वस्तादच्या पुढं कसं बोलायचं म्हणून म्हणाला, “ तुमी म्हणाल तसं”
“तुमी म्हणाल तसं काय? आज मटण खाऊयाचं. लय दिस झालं म्या बी खाल्लं न्ह्याय.”
वस्ताद बोलायचं थांबलं आणि बारक्याचं मन घराकडं कोकरावाणी दुडक्या मारत पळालं. भनीच्या, बाच्या आयच्या भोवती घुटमळाय लागलं. आयनं हातानं भाजल्याली जुंधळ्याची भाकरी. त्यावर कडक पापुडा आठवाय लागला.... त्वांड बाहीर केलं आणि डोळ्यातनं आल्यालं दोन पाण्याचं ठिपसं पुसलं. डोळं निवळलं.
निवळलेल्या डोळ्यांना रस्ता स्पष्ट दिसू लागला.मागं फुडं वाहनं न्हवती. जेवायसाठी घोरपडीचा फाटा.पुन्हा नागज, कुची आणि शिरढोण एवढं अंतर हुतं. कवठेमहांकाळच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या बोर्डानं कवाच स्वागत केलं हुतं. एखाद दुसरं वाहन
‘ढार ऽऽऽऽ ढार ऽऽऽऽ‘करत कुतत जात हुतं.
साडेनव वाजल्या असतील. वरनं माणसं धाड धाड आपटाय लागली. वस्ताद म्हणालं “बारक्या का बोंबलत्याती बघ बर?”
बारक्यानं पुन्हा त्वांड भाहीर काढलं आणि इच्चारलं, “ काय झालंय वं?”
“लघवीला जायचं हाय.”
वस्तादनं वैतागून ट्रक कडला लावला. केबिनमधली लायट लावली.बारक्यानं उढी टाकली.वरची तीन माणसं खाली आली.
बारक्या म्हणाला,” दुसरयालाबी खाली घ्या की, ते बी उरकत्याल.”
“त्यो व्हय शांत...झोपलाय. आमाला म्हणाला मिरजत गेल्यावर उठवा.” एका पारध्यानं सांगितलं. बारक्या माणसांच्या हातात पिशवी बघून म्हणाला, “ पिशवी कशाला खाली आणतायसा?”
“खाली ठिवतू की झोपायला आडचण हुत्या.”
“बरं – बरं आणा मी घितू.”
“तुमी कशाला घेतायसा मीच ठिवतु की.”
“तुमची मरजी.”
तिघंबी पारधी आत केबिनमधी घुसलं. बायकास्नी उठवलं. खाली उतरवलं. एकानं पिशवीत हात घातला. लांबडा – लचक कोयता भाहीर काढला. कोयत्याचं पात लायटीच्या उजिडात चकाकलं. वाघाच्या जिभीसारखं लप–लपाय लागलं. रक्तासाठी आसुसलं. काय कळायच्या आत वस्तादच्या नरड्यावर कोयता टेकला.
एकजण म्हणलं, “घडयाळ आन पैस काढ.”
“तुमच्या बाचं काय देन हाय काय?” वस्ताद म्हणाला.
नरड्यावरनं पातं घसरलं आणि ऊसाच्या बुडात हानावं तसं वस्तादच्या बावट्यावर घुसलं. रगात भळ-भळाय लागलं. बावट्याचं मास लोंबकळलं. वस्तादला काय करायचं कळंना. हात घामानं वलकिच झालं. काखत घामाच्या धारा लागल्या. कपाळावर दरदरून थ्यांब गोळा झालं.
चावी काढून डावर उघडला. घड्याळ आणि पैशाचा एक एक पुडका काढून देवू लागला. पैसं देताना वस्तादला मालक, घर, घरातली माणसं, धाकटा भाव, बायका-पोरं. म्हातारी आय-बा दिसाय लागलं पण इलाज नव्हता.
पारध्यांनी पैसं, घडयाळ खिशात भरलं आणि वस्तादला खाली ढकलत म्हणाली, “ चल उतर खाली.”
वस्ताद उतरलं. तिघं पारधी बी उतरली. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. रातकिडं किरकिराय लागलं हुतं. लांबून वाहन येत असल्याचा प्रकाश पडला. वस्तादच्या जीवात जीव आला. पारध्यांनी गडबड केली.डायवर-किन्नरला ढकलत रस्त्यापसनं लांब आत न्हेलं. बारकं टेकाडं लागलं. टेकाडाच्या आडोशाला गेली. मार दिला. वार झालं. बारक्या कवाच थंड झाला हुता. मगाशी डोळा घातलेल्या पारधीनीनं मोठा दगड उचलून वस्तादाच्या डोसक्यात घातला. ‘काच्च’ आवाजात डोसक्याचा चेंदा-मेंदा झाला. पायांची धडपड झाली. माती उधळली. धडपडणारं पाय शांत झालं.
*********************************************************************
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment